अपनेही घर में हम कैसे हुए पराये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:34+5:302021-06-27T04:20:34+5:30
नंदुरबार : राजकारणात निष्ठेला महत्त्व असते, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, अलीकडे सत्ताकेंद्रित राजकारणात निष्ठेला मात्र फारसे महत्त्व राहिले ...

अपनेही घर में हम कैसे हुए पराये...
नंदुरबार : राजकारणात निष्ठेला महत्त्व असते, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, अलीकडे सत्ताकेंद्रित राजकारणात निष्ठेला मात्र फारसे महत्त्व राहिले नाही. व्यक्तीचे ‘वजन’ लक्षात घेऊन त्याचे राजकारणातील स्थान निश्चित केले जाते. असेच काहीसे चित्र नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणातही पाहायला मिळत आहे. विशेषत: काँग्रेस पक्षात अलीकडेच जिल्हा परिषदेच्या चार सदस्यांना बजावलेल्या नोटिसींचे पडसाद उमटू लागले असून, त्यातून ज्या सदस्यांना नोटिसी बजावल्या त्यांचे ‘अपनेही घर में हम कैसे हुए पराये...’ असा सूर उमटू लागला आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेत ११ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वित्त आयोगाच्या निधी सर्व सदस्यांना समान वाटप करावा यासंदर्भातील निवेदनावर सही केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र अजित सुरूपसिंग नाईक, मधुकर सुरूपसिंग नाईक, देवमन पवार व शरद वसावे या चार सदस्यांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नोटीस बजावली. या नोटिसीवर काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील चित्र पाहिल्यास जिल्ह्यात सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काँग्रेस पक्षातच आजवर वाटचाल करणारे व पक्षाशी निष्ठा बाळगणारे एकमेव नेते म्हणजे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे एकमेव आहेत. आज काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नेते असले तरी त्यांचा प्रवास कुठल्या ना कुठल्या पक्षात झाला आहे. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची सुरुवात जनता दलापासून आहे. त्यानंतर काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवून विजय मिळविला होता व पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनीदेखील एक वेळ गवळी सेनेकडून निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांचे पुत्र भरत गावित यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्व. बटेसिंग रघुवंशी व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत रघुवंशी हेदेखील अनेक वर्षे काँग्रेसवासी होते. मात्र, दीड वर्षापूर्वीच त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे केवळ अपवाद आता ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक हेच राहिले आहेत. १९६० पासून त्यांची काँग्रेस पक्षात वाटचाल सुरू आहे. या काळात स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांचे ते निकटवर्ती राहिले आहेत. वयोमानाने ते निवडणुकीपासून अलिप्त असले तरी त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत, तसेच त्यांचे दोन्ही पुत्र व स्नुषा यादेखील काँग्रेसच्याच राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे निष्ठावान घराणे म्हणजे नाईक घराणे हे ओळखले जाते. याच घराण्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांना व त्यांच्याच गटातील इतर दोन सदस्यांना पक्षाने नोटीस बजावल्याने राजकीय पडसाद उमटणे स्वाभाविकच आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही नोटीस बजावली आहे. नाईक हे आज मंत्री के.सी. पाडवी यांचे निकटवर्ती मानले जातात. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनीच नाईक घराण्यातील सदस्यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याची नोटीस बजावली आहे. त्यावर संबंधितांनी आपण कुठलीही पक्षशिस्त मोडलेली नाही, विकासकामांबाबत सार्वजनिक भूमिका घेतली आहे. ती पक्षाच्या शिस्तीत मोडत नाही. पक्षाचीही विकासाबाबत सर्वसमान भूमिका असल्याने तीच भूमिका आपण घेतली; पण त्याचे कारण पुढे करून नोटीस बजावणे निश्चितच भेद निर्माण करणारी भूमिका असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. जे पक्षात निष्ठावान आहेत त्यांनाच आता बाहेरील पक्षातून येऊन लोक नोटिसा बजावत आहेत, अशी राजकीय चर्चा सध्या यानिमित्ताने सुरू झाल्याने तो सर्वच पक्षांसाठी विचार करायला भाग पाडणारा विषय ठरला आहे. काँग्रेसच्या चार जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा कार्याध्यक्षांची नोटीस बजावण्यामागील भूमिका काय होती, तो विषय वेगळा असला तरी त्यानिमित्ताने काँग्रेसअंतर्गत मोठे राजकारण शिजत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात काँग्रेसचेच कार्यकर्ते करत आहेत.