भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST2021-08-12T04:35:02+5:302021-08-12T04:35:02+5:30

भाजीपाला दररोज आहारात नियमित व आवश्यक आहे. श्रावण महिन्यात शाकाहारी भोजन करणाऱ्यांची संख्या वाढते. परिणामी भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. ...

The housewives' budget collapsed due to the increase in vegetable prices | भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

भाजीपाला दररोज आहारात नियमित व आवश्यक आहे. श्रावण महिन्यात शाकाहारी भोजन करणाऱ्यांची संख्या वाढते. परिणामी भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. भाजीपाला हा नाशवंत प्रकारात मोडला जात असल्याने त्याला बराच कालावधीसाठी स्टोरेज करता येत नाही. शेतातून विक्रीसाठी भाजीपाला आल्यानंतर २४ तासांच्या आत त्याची विक्री झाली नाही तर त्यानंतर तो कुजायला लागतो. भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वी सर्वसामान्यांच्या आटोक्यात होते. मात्र दोन महिन्यांनंतर त्यात कमालीची वाढ झाली असल्याने भाजीपाल्याच्या दरात कमालीची तेजी आहे.

येथून येतो भाजीपाला

नंदुरबार जिल्ह्यात सर्वात मोठी भाजी मंडई म्हणून शहादा येथील महात्मा जोतिबा फुले भाजीपाला मार्केटची ओळख आहे. या भाजी मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या या मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून तसेच धुळे जिल्‍ह्यातील कापडणे, साक्री, पिंपळनेर व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून विक्रीसाठी येत असतो. या भाजी मंडईत दररोज रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचा लिलाव होऊन होलसेल भावाने नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील सेंधवा व गुजरात राज्यातील राजपिपलापर्यंत भाजीपाल्याचा पुरवठा होतो. अतिपर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी असल्याने होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात ५० ते १०० टक्के भाववाढ झाल्याने किरकोळ विक्रीचे दर कमालीचे कडाडले आहेत.

बटाटा खातोय भाव

शहादा येथील भाजी मार्केटमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा व गुजरात राज्यातील ढिसा येथून आयात केला जातो. बटाट्याला भाजीपाल्याचा राजा म्हणतात. बटाटा हा सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये मिक्स करता येतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या फराळाच्या पदार्थांमध्ये याचा समावेश होत असल्याने दररोज किमान २५ टन बटाट्याची विक्री शहादा मार्केटमध्ये होत असते. वर्षभर बटाट्याच्या भावात चढउतार होत असतात.

व्यापारी म्हणतात..

पावसाळ्यात भाजीपाला सर्वात जास्त खराब होतो. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व अतिपर्जन्यमानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटते. परिणामी शेतकऱ्यांकडून मार्केटला पुरवठा कमी होतो. आवक कमी झाली तर भाववाढ होते. भाजीपाल्याचे दर हे दोन महिन्यापूर्वीपेक्षा आता होलसेल मार्केटमध्ये वाढले आहेत. भाजीपाला साठवण्यासाठी व्यवस्था नसल्याने दिवसभरात आलेल्या संपूर्ण मालाची विक्री रात्रीत करावीच लागते.

- भरत दुरंगी, सचिव, महात्मा फुले भाजी मार्केट, शहादा

पावसाळ्यापूर्वी भाजीपाल्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असल्याने दर आवाक्यात राहतात. मात्र भाजीपाला हा नाशवंत प्रकार असल्याने पावसाळ्यात भाजीपाल्याची नासधूस होत असल्याने आवक कमी होते. परिणामी भाजीपाल्याचे भाव वाढतात. भाजी मार्केटला शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणात पुरवठा होतो त्यानुसार भाजीपाल्याचे दर ठरत असतात.

-सतीश महाजन, अध्यक्ष, महात्मा फुले भाजी मार्केट, शहादा

गृहिणी म्हणतात..

पावसाळ्यात अनेकवेळा मनासारखी भाजी मिळत नाही. दैनंदिन आहारात समाविष्ट असलेल्या भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या दरातही वाढ झाली असल्याने आता करावे तरी काय? अशी विवंचना कायम असते. आवडीच्या भाज्यांचा समावेश दररोजच्या आहारात करावा तर त्यांच्या वाढलेल्या दरामुळे भाजी खरेदी करताना विचार करावा लागतो.

- उमा बागल, शहादा

आमच्या वसाहतीत दररोज भाजीपाला विक्री करणारी बाई येते. अनेकवेळा तिच्याकडे मेथी, पालक या आवडीच्या भाज्या नसतात. या भाज्या का नाही अशी विचारणा केली असता ती म्हणते आज होलसेल मार्केटमध्ये महाग दराने या भाज्यांची विक्री झाली असल्याने किरकोळ विक्री करताना ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही. म्हणून या भाज्या विक्रीला आणल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने मासिक बजेटही बिघडले आहे.

- सुनीता भामरे, शहादा

होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वी

मेथी ३० रुपये किलो

पालक १० रुपये किलो

कोथिंबीर १० रुपये किलो

मिरची १० रुपये किलो

टमाटे ५ रुपये किलो

वांगे २ रुपये किलो

लसूण २५ रुपये किलो

बटाटा १० रुपये किलो

होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे दर पावसाळ्यानंतर

मेथी ५० रुपये किलो

पालक २५ रुपये किलो

कोथिंबीर ४० रुपये किलो

मिरची २५ रुपये किलो

टमाटे १५ रुपये किलो

वांगे २५ रुपये किलो

लसूण ४० रुपये किलो

बटाटा १४ रुपये किलो

Web Title: The housewives' budget collapsed due to the increase in vegetable prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.