किराणा मालाच्या भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, खाद्यतेलात वर्षभरात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:25+5:302021-05-29T04:23:25+5:30

कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून सर्वसामान्य माणसाचे जीवन संचारबंदीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यातच किराणा मालाचे ...

Households' budget collapses due to rising grocery prices, edible oil doubles in a year | किराणा मालाच्या भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, खाद्यतेलात वर्षभरात दुप्पट वाढ

किराणा मालाच्या भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, खाद्यतेलात वर्षभरात दुप्पट वाढ

कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून सर्वसामान्य माणसाचे जीवन संचारबंदीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यातच किराणा मालाचे भाव खूपच वाढल्याने आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले आहे. मागीलवर्षी सोयाबीन तेलाचे भाव ८० ते ९० रुपये प्रती किलो असा होता. सध्या सोयाबीन तेलाचे भाव १७० रुपये प्रती किलो असा आहे. दिवसागणिक वाढणारे तेलाचे भाव व संसारोपयोगी वस्तूंचे भाव वाढतच असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले आहे.

सोयाबीन तेलाचे पाच लीटरच्या ड्रमसाठी ८३० ते ८५० रुपये मोजावे लागत आहेत. तर १५ लीटरच्या डब्याचा भाव अडीच हजार रुपयांच्या घरात आहे. वाढत्या तेलाच्या दरामुळे भाजीची फोडणी तेलाची द्यायची का पाण्याची द्यायची, असा संतप्त प्रश्न महिला उपस्थित करीत आहेत. कोरोनाच्या फैलावामुळे सततची संचारबंदी, उद्योगधंदे बंद पडल्यामुळे हाताला नसलेले काम, शेतातील मजुरीचे कामही मशागतीचे दिवस असल्यामुळे बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अन्य खाद्यतेलाचे दर उच्चांकी असल्यामुळे सर्वसामान्य जनता सोयाबीन तेलाला पसंती दर्शवितात. मात्र तेच आता अधिक महाग झाल्याने अशा बेरोजगारीच्या दिवसात सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने घर खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

किराणा मालात इतर वस्तूंचे भावही वाढले

आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भावासोबत गूळ, साखर, शेंगदाणे, डाळी तसेच इतरही किराणा मालाचे भाव वाढल्याने खायचे काय? असा प्रश्न संचारबंदीच्या या काळात गरीब जनतेला पडला आहे. हाताला काम नाही त्यातच दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती सामान्य जनतेची झाली आहे. त्यामुळे शासनाने खाद्यतेल व इतर किराणा वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सद्यस्थितीत शेतातही काम नाही. संचारबंदीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. दिवसेंदिवस खाद्य तेलासह किराणा मालाचे भाव वाढत असून गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने खाद्यतेलाच्या दरात घट करायला हवी.

-प्रियंका किशोर खलाणे, जयनगर, ता.शहादा

Web Title: Households' budget collapses due to rising grocery prices, edible oil doubles in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.