शहादा तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:06+5:302021-04-10T04:30:06+5:30

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला आहे. एका अहवालानुसार राज्याचा आठवड्याचा पाॅझिटिव्ह रुग्णांचा दर ५.५ टक्के आहे, तर ...

Hotspot of Shahada Taluka Corona | शहादा तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट

शहादा तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला आहे. एका अहवालानुसार राज्याचा आठवड्याचा पाॅझिटिव्ह रुग्णांचा दर ५.५ टक्के आहे, तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात हा दर राज्याच्या तुलनेत २५ वर पोहोचल्याचे म्हटले आहे. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची कारणे देताना तालुक्यात मोठ्या संख्येने विदेशातून विशेषतः अमेरिका व कॅनडामधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. २६ मार्च ते ५ एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार, शहादा तालुक्यात तब्बल ९५० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात शहादा शहर टाॅपमोस्ट असून, शहरात २७८ रुग्ण सापडले आहेत. त्या खालोखाल कोंढावळ ९६, म्हसावद ४७, लोणखेडा ३५, मंदाणे व फेस प्रत्येकी २६, सारंगखेडा २२ व टेंबे त.सा. २१ अशी रुग्णसंख्या आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातले असल्याने, शहरातील कोविड सेंटर फुल्ल झाली आहेत. रुग्णांना येथे बेड मिळत नसल्याने नाशिक, सुरत येथे रुग्णांना हलविण्यात येत आहे. रुग्णांना बाहेरगावी घेऊन जाण्यासाठीही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने जास्तीचे पैसे खर्चून नातेवाईक खासगी वाहनाने रुग्णांची सोय करीत आहेत. शहरात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन या सर्वांसाठीच रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागत आहे. खासगी कोविड सेंटरकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने नातेवाईक खर्च करायलाही तयार आहेत. मात्र, पैसे देऊनही योग्य व वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. स्वॅब तपासणी रिपोर्ट ५-६ दिवसांच्या अंतराने मिळत असल्या,ने रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांची तब्बेत खालावते. स्वॅब तपासणी रिपोर्टशिवाय गंभीर रुग्णालाही रुग्णालयात दाखल करून घेत नसल्याने रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकंदरीतच सर्वत्र निष्काळजी व असंवेदनशीलता असल्याने तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

Web Title: Hotspot of Shahada Taluka Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.