वंजारी सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:26+5:302021-08-23T04:32:26+5:30
रेणुकामाता, भगवान बाबा, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वंजारी सेवा ...

वंजारी सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
रेणुकामाता, भगवान बाबा, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वंजारी सेवा संघाच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. मंजुषा दराडे, प्रदेश उपाध्यक्ष अभिनव गिते, विभागीय अध्यक्ष दिनेश केकाण, कार्याध्यक्ष तुकाराम सांगळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, शशिकांत घुगे, चंद्रकांत आघाव, रवींद्र आघाव, दत्तात्रय नागरे, चंद्रशेखर कापसे, सुनील आव्हाड, रवींद्र सांगळे, सोनू गिते, युवा जिल्हाध्यक्ष विनायक काकड, मधुकर आव्हाड, अशोक आघाव, देवीदास पेटकर, पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर साबळे यांच्यासह संगमनेर, नाशिक, नांदगाव, धुळे, जळगाव, मनमाड येथील पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी डॉ. मंजुषा दराडे म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांत राज्यासह देशातील अनेक कुटुंबांना कोरोनामुळे झळ बसली, हृदयाची स्पंदने थांबली. मात्र सामाजिक संघटनांतून सर्वांनी लढा दिला. सोबतच महिलादेखील सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. सामाजिक कार्याची मोजमाप करता येत नाही. म्हणून प्रत्येक कुटुंब आणि समाजाने राष्ट्राच्या प्रगतीसाठी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, सावित्रीबाई फुले यांनी घालून दिलेला वारसा पुढील पिढीने आत्मसात करावा. उंबरठ्याच्या बाहेर जाऊन घर आणि समाजाच्या संस्कृतीचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून उस्मानाबाद येथील गौरीशंकर धुमाळ म्हणाले की, आज समाजसेवेसाठी संघटन आवश्यक आहे. लोकनेते म्हणून ख्याती प्राप्त झालेले स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कार्य राज्याला नव्हे तर देशाला प्रेरणादायी आहे. जातीसाठी माती खाण्याची गरज असून समाजसेवेला अर्थ येतो म्हणून अशा व्यक्ती कर्मयोगी ठरतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचे ध्येय बाळगल्यास समाज निश्चित दखल घेतो, असे सांगितले.
प्रास्ताविक वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष केतन गिते यांनी केले. सत्कारार्थीच्या वतीने प्रा. डॉ. विठ्ठल काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल पगारे यांनी तर आभार धवल पेटकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रमोद दराडे, देवेंद्र आघाव, लक्ष्मण बांगर, दिनेश आघाव, विनोद केकाण, राहुल गाभणे, मोहन सानप व वंजारी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.