सौम्य लक्षणे असलेल्यांना गृहविलगीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:16 IST2020-08-21T12:16:48+5:302020-08-21T12:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सौम्य लक्षणे असलेल्या बाधिताची इच्छा असल्यास आणि त्याच्या ...

सौम्य लक्षणे असलेल्यांना गृहविलगीकरण करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सौम्य लक्षणे असलेल्या बाधिताची इच्छा असल्यास आणि त्याच्या निवासस्थानी योग्य सुविधा असतील तर त्यांना गृहअलगीकरणात ठेवण्यास अनुमती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
कोरोनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी नियमावली तयार करावी. गृहअलगीकरणापूर्वी आरोग्य पथकाने बाधिताच्या घरी आवश्यक सुविधा असल्याची खात्री करून घ्यावी. त्याच्या घरच्यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. अलगीकरणासाठी घरात पुरेशी जागा असल्याची खात्री करून घ्यावी. गृहअलगीकरण ही ऐच्छिक बाब असेल. गृहअलगीकरणापूर्वी संबंधितांकडून त्याची इच्छा असल्याबाबत लेखी निवेदन घ्यावे. तालुक्याच्या यंत्रणेने बाधिताच्या संपर्कातील अधिक आणि कमी जोखमीच्या सर्व व्यक्तिंचे स्वॅब तातडीने घ्यावेत.
तळोदा आणि नवापूरच्या टीमने याबाबत विशेष दक्षता घ्यावी. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. ज्या गावात कोरोना बाधित आढळला त्याच्या परिसरातील गावातही लक्षणे असलेल्या व्यक्तिंबाबत माहिती घेतली जावी.
मृत्यू दर कमी करण्यासाठी सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची लवकर ओळख होऊन त्यावर उपचार होणे आवश्यक आहे. संपर्क साखळी तातडीने शोधण्यावर आणि स्वॅब तपासणी वाढविण्यावर भर द्यावा. खांडबारा येथे दोन टप्प्यात प्रत्येकी $४० असे ८० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करावे. तालुका नियंत्रण कक्षांनी तालुका स्तरावर स्वॅब घेण्याबाबत योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत संपकार्तील व्यक्तिंच्या तपासणीचे प्रमाण वाढवावे. नवापूर येथे कोविड केअर सेंटरबाबत मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.