बाम्हणे येथे अंत्यविधीत गेलेल्यांच्या शेतावरचे १९ मजूरही होमक्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:40 IST2020-06-18T12:40:09+5:302020-06-18T12:40:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे अंत्यविधी करुन परत आलेल्या प्रतापपूर ता़ तळोदा येथील १० जणांना ...

बाम्हणे येथे अंत्यविधीत गेलेल्यांच्या शेतावरचे १९ मजूरही होमक्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे अंत्यविधी करुन परत आलेल्या प्रतापपूर ता़ तळोदा येथील १० जणांना आरोग्य विभागाने मंगळवारी क्वारंटाईन केले आहे़ बाम्हणे येथील मयत कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने ही कारवाई करण्यात आली होती़ यानंतर या १० जणांच्या संपर्कात आलेले शेतमजूरही बुधवारी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ यामुळे गावात तालुक्यात या प्रकाराची चर्चा सुरु झाली आहे़
प्रतापपूर येथील तीन पुरुष आणि सात महिला असे १० जण १४ रोजी बाम्हणे येथे नातेवाईकच्या अंत्यविधीसाठी गेले होते़ हे सर्व लोक तेथून परतल्यानंतर मयत नातेवाईक हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती़ यामुळे तालुका आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत सर्वांना आमलाड ता़ तळोदा येथील क्वारंटाईन कक्षात दाखल केले आहे़ यानंतर गावात फवारणी व इतर उपक्रम सुरु करण्यात आले असताना या १० जणांच्या संपर्कात त्यांच्या शेतात काम करणारे तब्बल १९ मजूर आल्याची माहिती समोर आली होती़ यातून आरोग्य विभागाने तातडीने या सर्व शेतमजूरांची तपासणी करुन त्यांना होमक्वारंटाईन होण्याचे सूचित करण्यात आले आहे़ प्रतापपूर गावातील २९ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आणि होमक्वारंटाईन करण्यात आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे़ दरम्यान बुधवारी ग्रामपंचायत सरपंच रोहिदास पावरा, पोलीस पाटील बबन इंद्रजित, ग्रामसेवक पी़जी़माळी, निसारअली मक्राणी, सुरेश इंद्रजित, लक्ष्मण कोळी, प्रेमसिंग राजपूत यांनी गावात भेटी देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली होती़ गावात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले नागरिक आढळून आल्याने प्रतापपूर गावत १७ ते १९ जून या दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या काळात गावात अत्यावश्यक सेवा आणि शेतीकामेच सुरु ठेवण्याचे सांगण्यात आले आहे़ त्यानुसार ग्रामपंचायत कारवाई करत आहे़
आमलाड येथे क्वारंटाईन केलेल्या सात महिला आणि तीन पुरुषांमध्ये कोरोनाची सध्यातरी लक्षणे नसल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात येणार नाहीत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे़ हे सर्व १० जण १४ दिवस याठिकाणी राहणार आहेत़