शहाद्यातील टिळक चौकात ऐतिहासिक भुयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:24 IST2020-08-04T13:24:35+5:302020-08-04T13:24:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील टिळक चौकातील सुवर्णकार मंगल कार्यालयानजीक पालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जलवाहिनी दुरूस्त करत असताना ...

शहाद्यातील टिळक चौकात ऐतिहासिक भुयार
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील टिळक चौकातील सुवर्णकार मंगल कार्यालयानजीक पालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जलवाहिनी दुरूस्त करत असताना अचानक खड्डा पडला, आजुबाजूची माती त्या खोल खड्ड्यात जावू लागल्याने कुतूहल म्हणून कर्मचाऱ्यांनी आणखी खोदकाम केले असता तेथे प्राचीन भुयार आढळून आले आहे. फार पूर्वी अन्नधान्य साठविण्यासाठी जमिनीत विशेष पद्धतीने रचना केली जायची त्याला ‘पेव’ असे म्हटले जायचे त्या प्रकारची ही रचना असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीही याच भागातील गणपती मंदिराच्या परिसरात अनेकवेळा भुयारे आढळून आली आहेत.
येथील टिळक चौकाजवळ पाणीपुरवठा करणारी जल वाहिनी ब्लॉक झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्यानंतर विभागाचे कर्मचारी संजय सोनार व सहकाऱ्यांनी सुवर्णकार मंगल कार्यालय परिसरात जलवाहिनी दुरूस्तीसाठी काम सुरू केले. जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू असताना मंगल कार्यालयाच्या शेजारील भागात अचानक खोल खड्डा पडला. खड्डा पडल्याने आजुबाजूची सर्व माती त्या खड्ड्यात जात असताना कर्मचाºयांनी काम थांबवून नेमके काय घडले त्याची पाहणी केली असता तेथे सुमारे ४० ते ५० फूट खोल भुयार असल्याचे आढळून आले.
खोदकामात सापडलेल्या या भुयाराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली होती. त्यात दोन चौकोनी आकाराचे रस्ते व मध्यवर्ती भागात एक गोलाकार खोल खड्डा आढळून आला. एक रस्ता ज्या ठिकाणी सुवर्णकार गणेश मंडळाच्या गणपतीची स्थापना होते त्या दिशेने जात होता तर दुसरा रस्ता हा पश्चिमेकडे नदी काठाजवळ जात असल्याचे आढळून आले. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी गोलाकार खोल खड्ड्यात दगड टाकले असता तेथून पाण्याचा आवाज येत होता. प्राचीन काळी अशा पद्धतीच्या रचना करून त्यात धान्य साठा साठविला जात होता. या प्रकाराच्या रचनेला पेव असे म्हटले जायचे अशाच प्रकारचा ही रचना असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे टिळक चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर शहरातील अतिप्राचीन गणपती मंदिर आहे. या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. याप्रसंगी खोदकाम करताना अशाच प्रकारची विवरे व भुयारे या भागात यापूर्वी अनेक वेळा आढळून आली आहे. प्रत्येक वेळी भुयार आढळल्यानंतर त्याचा पूर्णपणे तपास व चौकशी करण्याऐवजी माती दगड टाकून ती बुजवली गेली आहे. तसाच प्रकार सुवर्णकार मंगल कार्यालयाच्या जवळ भुयार सापडल्यानंतर झाला. आढळलेल्या भुयारात विटा, माती व दगड टाकून बंद करण्यात आले. या भागात वारंवार भुयार आढळून येत असल्याने पुरातत्व विभागाने या संपूर्ण परिसराची गांभीर्याने तपासणी व चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गोमाई नदीकाठचा हा परिसर आहे. चावडी चौक ते कुकडेल परिसरातील अमरधामपर्यंत गोमाई नदीचा काठ आहे. या भागात अनेक वेळा भुयारे आढळून आल्याने याचा संबंध प्राचीन काळातील कुठल्यातरी कार्यकाळाशी असावा असा अंदाज वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. आढळून आलेले भुयार बंद केले असले तरी या परिसरात अचानक विशिष्ट रचनेचे भुयार आढळल्याने संपूर्ण दिवसभर त्याची चर्चा सुरू होती.