दारुची बाटली घेण्यासाठी दुकानासमोर रोजंदारीने माणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:12 IST2020-05-10T12:11:59+5:302020-05-10T12:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दारू मिळविण्यासाठी दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे राहण्यात अनेकांना संकोच वाटत असून त्यावर उपाय शोधत ...

Hired men in front of the shop to get a bottle of liquor | दारुची बाटली घेण्यासाठी दुकानासमोर रोजंदारीने माणसे

दारुची बाटली घेण्यासाठी दुकानासमोर रोजंदारीने माणसे

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : दारू मिळविण्यासाठी दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे राहण्यात अनेकांना संकोच वाटत असून त्यावर उपाय शोधत आता मद्यपींकडून रांगेत भाडोत्री माणसे उभे करण्यात येत आहेत. त्यातून काही जण दुसऱ्यासाठी रांगेत उभे राहून पैसेही मिळवीत आहेत.
लॉकडाऊनमध्ये अटी-शर्तींना अधिन राहून व सोशल डिस्टन्सिंग राखून शासनाने ाद्य विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. परंतु तब्बल दीड महिन्यानंतर मद्यप्रेमींसाठी मद्य विक्री खुली झाल्याने वॉईन शॉपवर गर्दी झाली. परंतु या प्रकाराची पूर्वकल्पना वॉईन शॉप मालकांना असल्याने त्यांनी दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पांढरे वर्तुळ काढून मद्य खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे दारू खरेदीसाठी दुकानासमोर रांगा लागल्या. त्यामुळे अनेकांची पंचाईत झाल्याचे पहायला मिळाले. अनेकांना दारू तर पाहिजे होती पण त्यांना रांगेत उभे राहायला संकोच वाटत असल्याचे पहायला मिळाले. कुणी ओळखीच्या व्यक्तीने दारूसाठी असणाºया रांगेत उभे असल्याचे पाहू नये म्हणून काहींची धडपड दिसून आली. या सर्व अडचणींवर मात करीत मद्यप्रेमींनी नामी शक्कल लढवत रांगेत उभे राहण्यासाठी भाड्याने माणसे मिळविण्यात आली व त्यांना रांगेत उभे करून दारूची खरेदी करताना मद्य शौकिनांकडून पाहायला मिळत आहे. रांगेत उभे राहण्याच्या एका राउंडसाठी भाडोत्री माणसांना ५० ते १०० रुपये देण्यात येत आहेत. दारूच्या ब्रँडवर रांगेत उभे राहणाऱ्यांकडून रांगेत उभे राहण्याचे पैसे आकारले जात असल्याचेही सांगितले जात आहे. सुरुवातीला मद्य शौकिनांना रांगेत उभे राहण्यासाठी भाडोत्री माणसे मिळवावी लागली. मात्र नंतर यातून चांगली कमाई होईल असे लक्षात आल्यावर रांगेत उभे राहून दुसºयाची दारू खरेदी करायला अनेक स्वखुशीने तयार झाल्याचे चित्र वाईन शॉपच्या बाहेर पहायला मिळाले.
तळोदा येथे सुरुवातीच्या दोन दिवसात मद्यप्रेमींची वाईन शॉपसमोर चांगलीच गर्दी पहायला मिळाली. मात्र त्यात कमालीची शिस्तही दिसून आली. प्रत्येक ग्राहक वर्तुळात उभा होता. हॉटेल सत्यमपासून डावीकडे तर उजवीकडे सेंट्रल बँकेपावेतो ठराविक अंतर ठेवून मद्यपी दारू खरेदीसाठी रांगेत शिस्तीने उभे दिसून आले. प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर लावण्यात येत होते व नंतरच पैशांची देवाण घेवाण व खरेदी होताना दिसून आली.

मद्यपान करणारे सर्वच क्षेत्रातील लोक कमी-अधिक प्रमाणात असून सकाळी आठ ते १२ मर्यादित वेळ असल्याने भरदिवसा रांगेत उभे राहून खरेदी करण्यापेक्षा डमी ग्राहकांना रांगेत उभे राहून बाटली पदरात पाडून घेतली. या भाडोत्री व्यक्तींना दारूच्या विविध ब्रँडची नावे उच्चारता येत नसल्याने अनेकांनी त्यांना कागदावर ब्रॅण्डचे नाव लिहून दिले. तर अनेकांना नंबर लागूनही ब्रॅण्डचे नाव न सांगता आल्याने मद्यापासून वंचित राहावे लागल्याचे किस्सेही घडले.

Web Title: Hired men in front of the shop to get a bottle of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.