महामार्गावरचा पूल कठड्याविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:50+5:302021-05-20T04:32:50+5:30
नंदुरबार : सेंधवा ते विसरवाडी दरम्यानच्या महामार्गाचे काम कोळदा (ता. नंदुरबार) येथून युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, विसरवाडी ते नंदुरबार ...

महामार्गावरचा पूल कठड्याविना
नंदुरबार : सेंधवा ते विसरवाडी दरम्यानच्या महामार्गाचे काम कोळदा (ता. नंदुरबार) येथून युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. या अंतरात ढेकवद ते नंदुरबार दरम्यानचा पूलही असून, या पुलावर साधे कठडेही नसल्याने वाहनधारकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण जिल्ह्यात सुरू आहे. नंदुरबार तालुक्यातील कोळदे ते शहादा तालुक्यालगतच्या मध्य प्रदेश सीमेपर्यंत या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते विकास महामंडळाकडून या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे हे काम वेगात असताना विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या कामाला मात्र अद्यापही सुरुवात झालेली नाही. यातच ढेकवद ते नंदुरबार दरम्यानच्या शिवण नदी पुलाची दिवसेंदिवस दुरवस्था होत असून, स्ट्रक्चरल ऑडिटचा अभाव असलेल्या या पुलावर कठडेच नसल्याने दररोज गंभीर अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. या पुलावरून दीड वर्षापूर्वी रिक्षा पडून अपघात घडला होता. यानंतरही पुलावर कठडे लावण्याची कार्यवाही झालेली नाही. हा पूल सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असतानाही कठडे लावण्याबाबत दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने अपघाताची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारकांची आहे.