६० वर्षावरील कोरोनाबाधितांचा सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:10+5:302021-02-08T04:28:10+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ६० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर शून्य ते २४ ...

६० वर्षावरील कोरोनाबाधितांचा सर्वाधिक मृत्यू
नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ६० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर शून्य ते २४ वयोगटातील एकाचाही मृत्यूत समावेश नाही. दरम्यान, जिल्ह्यात मृत्युदर कमी झाला असून कोरोनामुक्तीचा दरदेखील वाढला आहे.
नंदुरबारात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर महिनाभर बाधितांची संख्या फारशी वाढली नाही. परंतु जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. दिवाळीच्या आधीदेखील संख्या कमी झाली, परंतु दिवाळीनंतर त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. सर्व व्यवहार रुळावर आले आहेत. असे असताना रुग्ण संख्या देखील दररोज ३० पर्यंत जात आहे. जिल्ह्यात मृत्युदर हा अडीच ते तीन टक्केच्या आत राहिला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक पुरुष आहेत. वयोगटाचा विचार करता शून्य ते २४ वयोगटातील मृत्यू संख्या शून्य आहे. ४६ ते ६० आणि ६० वर्ष वयावरील बाधितांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या संदर्भातील भीती आता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. व्यवहार सुरळीत होऊ लागला असून अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय यावर गदा आलेली आहे. त्यामुळे रोजगाराचा शोध अद्यापही काही ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
होम आयसोलेशन बंद...
रुग्णसंख्या वाढत होती त्यावेळी शासकीय यंत्रणेवर ताण पडत होता. रुग्णांना बेड मिळत नव्हते. क्वॅारंटाईन केंद्र हाऊसफुल्ल होत होती. त्यामुळे शासनाने कमी लक्षणे व ज्यांना लक्षणेच नाहीत अशा रुग्णांना घरीच आयसोलेशन होऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु त्याचा दुरपयोग होऊ लागला होता. बाधित व्यक्ती परिसरात फिरण्यासह त्याच्याकडून काळजी घेतली जात नव्हती. अशातच रुग्ण संख्या देखील वाढू लागल्याने शेवटी होम आयसोलेशनचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे आता बाधित प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो.
जुलै, ॲागस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यू
गेल्या ११ महिन्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यू संख्या ही जुलै ते ॲागस्ट महिन्यात झाली आहे. त्यानंतर मध्यंतरी मृत्यू संख्या कमी झाली. परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात त्यात पुन्हा वाढ झाली. जुलै महिन्यात ३०, ॲागस्ट महिन्यात ४८, सप्टेंबर महिन्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्यात १८ तर जानेवारी महिन्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू संख्या सर्वाधिक शहादा व नंदुरबार तालुक्यातील आहे, तर सर्वात कमी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात असल्याचे चित्र आहे.