अवजड वाहनांमुळे तळोद्यातील मुख्य रस्त्यांवर होते वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:24 IST2021-01-22T13:24:35+5:302021-01-22T13:24:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अवजड वाहन चालक आपले वाहन शहरातील मुख्य बाजारपेठेकडूनच नेत असल्यामुळे सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत भर ...

अवजड वाहनांमुळे तळोद्यातील मुख्य रस्त्यांवर होते वाहतुकीची कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अवजड वाहन चालक आपले वाहन शहरातील मुख्य बाजारपेठेकडूनच नेत असल्यामुळे सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असून, वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेनेदेखील याकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने तरी वाहतुकीच्या कोंडीबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
ट्रक, डंपर व उसाने भरलेला ट्रॅक्टर अशी अवजड वाहने चालक सर्रासपणे शहरातून नेत असतात. हे वाहन चालक मुख्यतः बस स्थानक, मेन रोड, हातोडा रोड अशा वर्दळीच्या प्रमुख मार्गावरून नेत असतात. त्यामुळे येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. कधी कधी १५ ते २० मिनिटापर्यंत कोंडी सुटत नाही. काही वाहनचालक जोर जोराने वाहनांचे कर्कश हॉर्न वाजवत असतात. साहजिकच यामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणास तोंड द्यावे लागते. त्यातही अवजड वाहनांमधून पुढे मार्गक्रमण करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते, अशी व्यथा काही पादाचारीनी बोलून दाखवली आहे. आधीच व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमण व त्यातच गाड्या मनमानीपणे रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या जात असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात अवजड वाहनांनी भर टाकली आहे. वास्तविक रोजच वाहतुकीच्या कोंडीचे चित्र तळोदेकरांना पहावयास मिळत असताना ते पोलिसांना दिसत नसल्याने शहरवासीयांनी सखेद आशचर्य व्यक्त केले आहे. वाहतुकीची ही डोकेदुखी केव्हा मिटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. निदान नूतन पोलीस निरीक्षकांनी तरी या प्रकरणी सुयोग्य नियोजन करावे अशी तमाम तळोदाकरांची रास्त अपेक्षा आहे.
मोकाट गुरांच्या प्रश्न मार्गी लावावा.
मोकाट गुरांमुळे सर्वच जण प्रचंड वैतागले आहेत. मात्र पालिका आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांनी त्याकडे साफ कानाडोळा केला आहे. तसेच पशुपालकांवर ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे त्यांची मनमानी अधिकच वाढली आहे. शहरवासीयांनीदेखील सोशिक भूमिका घेतल्याने पालिकेने सुध्दा गिळमिळीत धोरण घेतले आहे. परिणामी मोकाट गुरेही शहरवासीयांच्या पिच्छा सोडत नसल्याचे विदारक चित्र आहे
वाहतूक शाखेला केवळ डायव्हर्शनकडेच इंटरेस्ट.
शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये, ती सुरळीत रहावी याची जबाबदारीदेखील वाहतूक शाखेची असते. परंतु याचे भान पोलीस विसरले की, काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कारण केवळ मारोती मंदिर वगळता इतरत्र वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलीस दिसतच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हातगाड्याधारक व वाहन चालक यांचे फावले आहे. अगदी कुठेही रस्त्याच्या कडेला वाहने लावतात आणि वाहतुकीची कोंडी करीत असतात. शुक्रवार हा बाजाराच्या दिवस असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे समजू शकतो. परंतु ही कोंडी आता कायमचीच झाली आहे. वास्तविक निदान बस स्थानक रोड, मेन रोड या दोन प्रमुख मार्गांवर तरी सुरळीत वाहतुकीसाठी एखादा कर्मचारी कायम स्वरुपी नेमणे आवश्यक आहे. तथापि पोलिसांना डायव्हर्शन रस्त्यातच अधिक इंटरेस्ट असल्याचा नागरिकांच्या आरोप आहे. अधिकाऱ्यांनी ही याबाबीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजीच्या सूर व्यक्त केला जात आहे. शहरवासीयांना सतत डोकेदुखी ठरणारी वाहतुकीच्या कोंडीविषयी वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी आहे.