नंदुरबारसह परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:32 IST2019-09-06T12:32:05+5:302019-09-06T12:32:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनेक दिवसांच्या खंडानंतर नंदुरबार, शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. साधारणत: ...

नंदुरबारसह परिसरात मुसळधार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनेक दिवसांच्या खंडानंतर नंदुरबार, शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. साधारणत: अर्धा ते एक तास चाललेल्या या पावसामुळे नंदुरबारातील अनेक भाग जलमय झाले. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात आणि परिसरात पाणी साचल्याने मंडळ कार्यकत्र्याची एकच धावपळ उडाली. शेतांमध्ये देखील पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले.
जिल्ह्यात जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पावसाची संततधार होती. या काळात तीन वेळा अतिवृष्टीची नोंद देखील करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे, लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. पाच तालुक्यांमधील पावसाची सरासरी देखील 100 टक्केपेक्षा अधीक गेली आहे. सर्वत्र समाधानकारक स्थिती आहे. पावसाने गेल्या दोन ते तीन आठवडय़ांपासून विश्रांती घेतल्याने शेती कामांना वेग आला होता. आता परतीच्या पावसाची प्रतिक्षा लागून असतांना बुधवारी रात्री व गुरूवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री शहादा तालुक्यातील तापी पट्टय़ात मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी आद्रतेत वाढ झाल्याने उकाडय़ाने हैराण केले होते. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस सुरू होता.
गणपती मंडपांमध्ये पाणी
नंदुरबारातील अनेक भागातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये पाणी घुसले होते. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची जागा नसल्यामुळे मंडप व परिसरात पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी मंडळ कार्यकत्र्याची कसरत होत होती. काही मंडळांच्या आरास आणि सुशोभिकरणाचे नुकसान झाले. मंडपांचे देखील नुकसान झाले. त्यामुळे काही मंडळांनी गुरुवारी रात्री आरास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
शेतांमध्ये पाणी
मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. यामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. गेल्या दोन ते तीन आठवडय़ात शेतक:यांनी शेतीची मशागत केली होती. काही ठिकाणी मका, मूग, चवळी काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
रस्त्यांची पुन्हा दैना
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. आजच्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांची पुन्हा दैना झाली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकी व तीन चाकी वाहने बंद पडत होती. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते.
सारंगखेडा परिसरात बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिके पुन्हा पाण्याखाली आली आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच बुधवारी रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साचल्याने पिकांचे नुकसान होणार असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. परिसरातील कु:हावद, कौठळ, बिलाडी, अनरद, पुसनद, सारंगखेडा, टेंभा, देऊर, कळंबू, बामखेडा त.सा. आदी भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.