मंत्रीपदासाठी पाडवींची जोरदार ‘फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:54 IST2019-12-04T11:54:06+5:302019-12-04T11:54:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने त्यासाठी मंत्रीपद मिळावे यासाठी अनेक आमदारांनी दिल्लीत ठाण मांडला ...

मंत्रीपदासाठी पाडवींची जोरदार ‘फिल्डिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने त्यासाठी मंत्रीपद मिळावे यासाठी अनेक आमदारांनी दिल्लीत ठाण मांडला आहे़ विशेषत: काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार अॅड़ के़सी़पाडवी यांचे नाव आघाडीवर असून त्यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार फिल्डिंग सुरु आहे़
राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे़ सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसह केवळ सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे़ उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे़ सत्ताधारी पक्षापैकी जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत़ त्यात आमदार के़सी़पाडवी व आमदार शिरीष नाईक यांचा समावेश आहे़ हे दोन्ही आमदार राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने दोघांनी मंत्रीपदाचा दावा केला आहे़ अॅडक़े़सी़पाडवी हे सलग सात वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत़ यापूर्वी त्यांना काँग्रेस पक्षातर्फे आघाडीचे सरकार असताना राज्यमंत्रीपदासाठी निमंत्रण होते़ मात्र त्यांनी राज्यमंत्री पद स्विकारण्यास नकार दिला होता़ नुकतीच त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली़ त्यात पराभूत झाले असले तरी त्यांना मोठे मताधिक्क्य मिळाले होते़ पक्षांतराच्या वातावरणात अनेकांनी पक्ष सोडला असला तरी ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले़ त्यामुळेच विधानसभा निवडणूकीत त्यांना राज्यात महत्त्वाचे स्थान पक्षाने दिले होते़ सत्ता स्थापनेतही पक्षाच्या समितीत ते होते़ त्यामुळे सहाजिकच मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे़ सध्या ते दोन दिवसांपासून दिल्लीतच पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत़ अर्थात त्यांचे नाव आघाडीवर असले तरी आमदार शिरीष नाईक हे देखील प्रबळ दावेदार आहेत़ माजीमंत्री व ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे ते पुत्र असून त्यांचा गांधी घराण्याशी जवळचा संबध आहे़ दिल्लीत त्यांचे वजन असल्याने शिरीष नाईक यांचीदेखील मंत्रीपदासाठी वर्णी लागू शकते अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे़ जिल्ह्यातील व राज्यातील काही नेते देखील त्यांच्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे़
काँग्रेस पक्षात ऐनवेळी काहीही घडू शकते अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असून त्यामुळे मंत्रीपदासाठी आमदार अॅड़ के़सी़पाडवी कि शिरीष नाईक या दोघांपैकी कोणाची वर्णी लागते़ याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़