गुटखा तस्करीवर आता मुळासकट घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 13:05 IST2020-09-18T13:05:03+5:302020-09-18T13:05:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधून नंदुरबारमार्गे उत्तर महाराष्टÑासह राज्यभरात होणारी गुटखा तस्करी रोखण्यासाठी आता थेट मुळावर घाव घालण्यात ...

गुटखा तस्करीवर आता मुळासकट घाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमधून नंदुरबारमार्गे उत्तर महाराष्टÑासह राज्यभरात होणारी गुटखा तस्करी रोखण्यासाठी आता थेट मुळावर घाव घालण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या कंपनीचा गुटखा सापडेल त्या उत्पादक कंपनीसह तो माल खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या रस्ता अपघातावर उपाययोजनेसाठी रोड ट्रॉफिक आॅडीक केले जाणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.प्रताप रामचंद्र दिघावकर यांनी दिली.
डॉ.दिघावकर यांनी महानिरिक्षकपदी पदभार स्विकारल्यानंतर गुरुवारी नंदुरबारात भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सकाळी त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात गुन्हे संदर्भात आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दिघावकर यांनी सांगितले, जिल्ह्यात गुन्हे नियंत्रण चांगले आहे. गुन्हे शोधचे प्रमाणही उत्कृष्ट आहे. पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना पकडण्याची राबविलेली मोहिम आणि त्या अनुषंगाने ताब्यात घेतलेले आरोपी याबाबत विभागात नंदुरबारची कामगिरी चांगली राहिली आहे.
गुटखा तस्करी रोखणार
गुजरातमधून जिल्हामार्गे थेट राज्याच्या विविध भागात गुटखा तस्करी होते. पोलिसांकडून कारवाई होते परंतु केवळ वाहनाचा चालक व सहचालकावर गुन्हे दाखल करण्यात येतात. आता ही तस्करी रोखण्यासाठी उत्पादन करणारे, ठोक खरेदी व विक्री करणाºया व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत सिमेवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून नेहमी गुन्हे दाखल होणाºयांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहितीही दिघावकर यांनी दिली.
थेट मोक्का लावणार
रस्ता लूट आणि जबरी चोरीच्या घटना जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा भागात घडल्या आहेत. त्या घटनांची गंभिरता आणि आरोपींची दहशत याची पडताळणी करून संबधीतांवर थेट मोक्का लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जबरी चोरी करणाºया संशयीतांचा अभिलेख करण्यात येणार आहे.
वाहन चालकांवर कारवाई
रहदारीचे नियम तोडणे, विना परवाना वाहतूक यासह इतर कलमान्वये वाहनचालकांवर कारवाई केली जाते. याबाबत वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना टार्गेटही दिले जाते. त्यामुळे सामान्य नागरिक आणि पोलीस दलातील कर्मचारी देखील वैतागले आहेत. याबाबत पत्रकारांनी दिघावकर यांना छेडले असता त्यांनी टार्गेट घेऊन वाहनांवर कारवाई केली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तशा सुचना संबधितांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारी दत्तक योजना
गेल्या आठ ते दहा वर्षात घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना दत्तक घेण्याची योजना पोलीस दल राबविणार आहे. त्या गुन्हेगाराचा अभ्यास करून तो एका हवालदाराला दत्तक दिला जाणार आहे. त्याचे मत परिवर्तन करणे, तो काय अॅक्टिव्हिटी करतो त्याचा अभ्यास करणे, त्यासाठी सर्व्हलन्स ट्रॅकिंग सिस्टिम लावणे अशी उपाययोजना केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रोड ट्रॅफिक आॅडीट
जिल्ह्यातील ज्या महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांवर वारंवार अपघात होतात. त्या रस्त्याचे रोड ट्राफिक आॅडीट केले जाणार आहे. त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या जातील. वाहतुकीचे काय नियम या ठिकाणी पाळणे आवश्यक आहे. बांधकामाच्या दृष्टीने काय बदल केला जाऊ शकेल, ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी तांत्रिक उपाययोजना काय करता येतील याचा त्यात समावेश राहणार आहे. याचा अहवाल संबधित विभागांना देखील दिला जाणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.
कोरोनापासून पोलीस सुरक्षीत
कोरोना काळात पोलिसांची कामगिरी चांगली राहिली. सामाजिक उपक्रमांसह कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी देखील उपाययोजना झाल्या. परंतु अनेक पोलीस कर्मचारी बाधीत झाले आहेत. त्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी बरे झाले आहेत. दुर्दैवाने एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला असून कोरोना योद्धा म्हणून शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.