१३ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:28 IST2020-08-21T12:28:35+5:302020-08-21T12:28:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निझर (गुजरात)मधून अहमदनगर येथे जाणारा १३ लाख ७१ हजार रुपयांच्या गुटख्यासह एकुण २६ लाख ...

१३ लाखांचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निझर (गुजरात)मधून अहमदनगर येथे जाणारा १३ लाख ७१ हजार रुपयांच्या गुटख्यासह एकुण २६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल एलसीबीने जप्त केला. याप्रकरणी चालक व सहचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातमधून गुटखा भरून वाहन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला मिळाली होती. त्यानुसार २० रोजी पहाटे पथकाने निझर-नंदुरबार रस्त्यावर पाळत ठेवली होती. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निझरकडून एक आयशर ट्रक (क्रमांक एमएच १६- सीसी ८६२४) येतांना दिसताच पथकाने त्यांना मन्सूरी टेन्ट हाऊसच्या परिसरात अडवून तपासणी केली. सुरुवातीला चालकाने ट्रकमध्ये गुरांची ढेप असल्याचे सांगितले. पथकाने अधीक तपासणी केली असता ढेपच्या खाली पोत्यांमध्ये गुटखा दिसून आला. हा गुटखा निझर येथील शितल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून अहमदनगर येथील मोहसीन पटेल यांच्याकडे नेण्यात येत असल्याचे चालक भास्कर विजय भोसले, रा.रामपूर, ता.राहुरी व सहचालक महमद अझरुद्दीन शकील शेख, रा.अहमदनगर यांनी सांगितले.
पोलिसांनी ११ लाख ६६ हजार ८८० रुपये किंमतीचा विमल गुटखा, दोन लाख पाच हजार ९२० रुपये किंमतीचे तंबाखू पाकीट, १२लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक, ३० हजारांचे दोन मोबाईल, २७ हजारांची गुरांची ढेप असा एकुण २६ लाख २९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाइ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार मुकेश तावडे, राकेश मोरे, राकेश वसावे, दादाभाई मासुळ, महेद्र सोनवणे, आनंदा मराठे, राजेद्र काटके, किरण मोरे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली.