खावटी अनुदान योजनेंतर्गत तीन तालुक्यांतील ६५ हजार आदिवासी लाभार्थ्यांना अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:53+5:302021-05-31T04:22:53+5:30
तळोदा : राज्य शासनाच्या खावटी अनुदान योजनेंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यांतील ६५ हजार आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी ...

खावटी अनुदान योजनेंतर्गत तीन तालुक्यांतील ६५ हजार आदिवासी लाभार्थ्यांना अनुदान
तळोदा : राज्य शासनाच्या खावटी अनुदान योजनेंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यांतील ६५ हजार आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागाकडून दोन हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली आहे. उर्वरितांचीही कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
कोरोना महामारीमुळे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने गरीब आदिवासी कुटुंबांना आर्थिक व धान्य स्वरूपात मदत करण्यासाठी गेल्या वर्षी चार हजार रुपयांची खावटी अनुदान योजना जाहीर केली होती. यासाठी साधारण सव्वा चारशे कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला होता. अशा पात्र आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर येथील प्रकल्प प्रशासनाने पात्र लाभार्थींची पडताळणी करून प्रत्यक्ष लाभासाठी यादी नाशिक आदिवासी विकास कार्यालयाकडे पाठविली होती.
या कार्यालयाकडून ८२ हजार लाभार्थ्यांची यादी सादर करण्यात आली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये अनुदान टाकण्याची कार्यवाही केली जात आहे. परंतु, अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्याची कार्यवाही अत्यंत संथगतीने होत असल्याने ‘लोकमत’ने याबाबत वस्तूनिष्ठ वृत्त प्रकाशित केले होते. कारण सात दिवसांत केवळ १५ हजार लाभार्थ्यांचे अनुदान टाकण्यात आले होते. साहजिकच पालकमंत्र्यांनी खुद्द दखल घेऊन गती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे कार्यवाहीस गती देण्यात आली. शुक्रवारपर्यंत जवळपास तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तिन्ही तालुक्यांतील ६५ हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. कोरोना महामारीच्या ऐन लॉकडाऊनमध्ये रक्कम गरजू कुटुंबांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे आदिवासींनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि, अजूनही १७ हजार लाभार्थी शिल्लक राहिले आहेत. त्यांचाही विचार करून तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आहे.
धान्याच्या किटसाठीही झाले नियोजन
शासनाच्या खावटी अनुदान योजनेकरिता राज्यातून साधारण १० लाखांपेक्षा अधिक लाभार्थी पात्र ठरले आहेत. या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाने चार हजार रुपयांच्या अनुदानात दोन हजार रोख व दोन हजारांचे धान्य अशी मदत देण्याचे नियोजन केले आहे. त्यातील दोन हजार रुपयांचे रोख अनुदान देण्यात आले आहे. आता धान्य स्वरूपातील अनुदानाची कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी युद्धपातळीवर ठेकेदारांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वाटपाची कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे धान्य त्यांना पोहोचविण्याची कार्यवाही झाली तर दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे म्हणणे आहे. शिवाय त्यांना साठवूनही ठेवता येईल.
आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत ६५ हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचे रोख अनुदान टाकले आहे. उर्वरितांची कार्यवाही सुरू आहे. शिवाय धान्य किटसाठीचे नियोजनदेखील पूर्ण झालेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वाटपाचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. - अमोल मेटकर, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा.