धडगाव तालुक्यात ग्रामपंचायत रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:59 IST2020-03-02T11:59:08+5:302020-03-02T11:59:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे़ यापार्श्वभूमीवर तालुक्यात पुन्हा ...

धडगाव तालुक्यात ग्रामपंचायत रणधुमाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे़ यापार्श्वभूमीवर तालुक्यात पुन्हा राजकीय वारे वाहत असून १६ गावे आणि पाड्यांवर इच्छुकांची मोेर्चेबांधणी सुरु आहे़
तालुक्यातील धनाजे बुद्रुक, भोगवाडे, उमराणी बुद्रुक, घाटली, खामला, काकर्दा, आचपा, मुंदलवड, मनवाणी बुद्रुक, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली, वरखेडी बुद्रुक, कुंडल आणि हातधुई या १६ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत़ यापैकी काकर्दा, धनाजे, उमराणी, सिसा, भोगवाडे, कुंडल ही गावे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जातात़ याठिकाणी सत्ता मिळावी यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असून सदस्यांचे पॅनल निवडून आणण्यासाठी तयारी सुरु झाली आहे़ या ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून तालुक्यात प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवड होणार आहे़ निवडून येणारे सर्व १६ सरपंच हे तालुक्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथम लोकनियुक्त म्हणून ओळखले जाणार आहेत़ यामुळे निवडून येण्याच्या उद्देशाने इच्छुक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे चकरा मारत असल्याचे चित्र आहे़ येत्या ६ ते १३ मार्च दरम्यान नामनिर्देशन दाखल करता येणार आहेत़ अर्जांची छाननी १६ मार्च रोजी होणार असून १८ रोजी माघारीची अंतीम मुदत असून २९ रोजी मतदान होणार आहे़ मतदानाची मतमोजणी ही त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार ३० मार्च रोजी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहिर करण्यात येणार आहे़