मेडिकल कॉलेजसाठी शासन तीन कोटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:19 IST2020-02-01T13:18:49+5:302020-02-01T13:19:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ४५ कोटी ४३ लाख रुपयांची वाढ करुन ११५ कोटी रुपयांच्या ...

मेडिकल कॉलेजसाठी शासन तीन कोटी देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ४५ कोटी ४३ लाख रुपयांची वाढ करुन ११५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मान्यता देत नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यास शासनाने मंजूरी दिली़ नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मंजूरी दिली़
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाशिक विभागासाठी २०२०-२०२१ चा सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे बैठक घेण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड़ सिमा वळवी, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आदिवासी दुर्गम भागातील सुविधांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून सुविधांसाठी आदिवासी विकास योजनेतून देखील नंदुरबार जिल्ह्यासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीसाठी राज्यस्तरावरुन तरतूद करण्यात यावी, नेत्र रुग्णालयाच्या नव्या इमारतीत रुग्णांसाठी शिबीर घेऊन नव्याने उभारलेल्या इमारतींभोवती झाडे लावून कामे दजेर्दार करावी तसेच पोलीसांच्या वाहनासाठी १ कोटीचा निधी खर्च करावी असे सांगितले़
बैठकीत पालकमंत्री अॅड़ के़सी़पाडवी यांनी रस्त्यांची दुरुस्ती आणि मजगीची कामे यासाठी अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे सांगितले.
सर्वसाधारण योजनेअंतर्गत कृषी व सलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, परिवहन, सामाजिक व सामुहिक सेवा, सामान्य सेवा या योजनांच्या विविध विकासकामांसाठी वाढीव मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी ४५ कोटींच्या वाढीव मागणीस मान्यता देण्यात आली. पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत राज्यस्तरावरून सहकार्य करण्याबाबत प्रयत्न करण्याचे तसेच आकांक्षीत जिल्हा योजनेअंतर्गत शाळांची स्थिती सुधारण्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल बैठकीत कौतूक करण्यात आले़