एक रुपयाही मानधन न घेता शेकडो विद्यार्थी घडविणारे गोसावी मास्तर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:42+5:302021-09-05T04:34:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विनाअनुदानित तत्त्वाच्या शासनाच्या धोरणाने शेकडो शिक्षकांना वेठबिगारी ठरविले आहे. या शिक्षकांच्या व्यथा आणि वेदना ...

एक रुपयाही मानधन न घेता शेकडो विद्यार्थी घडविणारे गोसावी मास्तर!
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विनाअनुदानित तत्त्वाच्या शासनाच्या धोरणाने शेकडो शिक्षकांना वेठबिगारी ठरविले आहे. या शिक्षकांच्या व्यथा आणि वेदना त्या शिक्षकांनाच ठाऊक. पण वेतन मिळाले नाही म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविणे थांबवित नाहीत. त्याचा प्रत्यय गोसावी मास्तरांनी घडविला आहे. तब्बल १७ वर्षे विना अनुदानित तत्त्वावरील शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झाले. एक रुपयाही वेतन त्यांना सेवा काळात मिळाले नाही. त्याबाबत कुठलीही तक्रार न करता आपण शेकडो विद्यार्थी घडविले यातच ते आनंद मानतात.
घोटाणे, ता.नंदुरबार येथील अरविंद रघुनाथ गोसावी या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची ही कहाणी आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच सोडून ते शिक्षक झाले. त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड्.पर्यंत झाले असून, पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला. अखेर गावातच जनता माध्यमिक विद्यालयात त्यांना नोकरीची संधी मिळाली. अर्थातच ही शाळा विनाअनुदानित तत्त्वावर असल्याने तेथे ते सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नोकरीला लागले. २००३ मध्ये त्यांना अधिकृत मुख्याध्यापक म्हणून मान्यताही मिळाली. शाळा नवीनच असल्याने एकीकडे शाळेचे उभारणीचे कामही त्यांनी सुरू केले आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठीही पुढाकार घेतला. सरांचा इंग्रजी विषय असल्याने अगदी पाचवीपासून ते १० वीपर्यंत ते विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवित होते. याशिवाय हिंदी आणि भूगोल हा विषयही त्यांनी शिकविला. शाळेत तब्बल ३०० विद्यार्थी संख्या होती. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर त्यांनी तब्बल १७ वर्षे सेवा केली. वयोमानानुसार ३० नोव्हेंबर २०१६ ला ते सेवानिवृत्त झाले. तोपर्यंत शाळा विनाअनुदानितच असल्याने त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत एक रुपयाही वेतन मिळाले नाही.
अर्थात वेतन मिळाले नसले तरी गोसावी मास्तर मात्र आपल्या कामाने समाधानी आहेत. किमान विद्यार्थ्यांना शिकविण्याची आणि घडविण्याची संधी आपल्याला मिळाली ही आपल्या आयुष्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे ते सांगतात. आपण १७ वर्षाच्या सेवेत अनेक विद्यार्थी घडविलेत. त्यामुळे जे केले त्यात मोबदला नसला तरी मनाचे समाधान मोठे आहे, असे ते सांगतात.
१७ वर्षांच्या शिक्षक म्हणून दिलेल्या सेवेने आपण खूप समाधानी आहोत. या काळात आपल्याला एक रुपयाही मानधन मिळाले नसले तरी शिक्षक म्हणून विद्यार्थी घडविण्याचे आणि त्यांंना मार्ग दाखविण्याचे पुण्य मिळविता आले ती खरी आपल्या आयुष्याची कमाई आहे. आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकविले त्यातील अनेक जण आज इंजिनिअर, एसआरपीत अधिकारी, शिक्षक आहेत. ही मंडळी समाज आणि देश सेवेच्या कार्यात काम करीत आहे. वेतन न मिळाल्याने संसारात अडचणी खूप आल्या. पण कुटुंबाची ही साथ मिळाली. आपण ज्या शाळेचे रोपटे लावले होते ते आज वटवृक्ष होत आहे. शेकडो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. भावी पिढी चांगली घडावी हीच अपेक्षा आहे.
- अरविंद रघुनाथ गोसावी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक