शहाद्यात गोकर्ण महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST2021-07-26T04:27:55+5:302021-07-26T04:27:55+5:30
शहरातील संत सेनानगर भागात श्री गोकर्ण महादेव प्राणप्रतिष्ठा समारंभ कार्यक्रम सुरू असून, ब्रह्मलीन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी रामानंदपुरी ...

शहाद्यात गोकर्ण महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा
शहरातील संत सेनानगर भागात श्री गोकर्ण महादेव प्राणप्रतिष्ठा समारंभ कार्यक्रम सुरू असून, ब्रह्मलीन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी रामानंदपुरी यांचे मानसपुत्र संतोष महाराज व चैतन्य बापू यांच्या कृपा आशीर्वादाने गोकुळ महादेव, श्री गणेश, हनुमान, श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नवदांपत्य आकाश श्याम जाधव व त्यांच्या धर्मपत्नी यांनी पूजन करून या शोभायात्रेचा आरंभ केला. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सोमवार, २६ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता काकड आरती, मूर्ती न्यास, दर्शन विधी, स्नान, अभिषेक, कलश, घंटा, ध्वजारोहण तसेच प्रधान गोकुळ महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. संतोष महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्य पुरोहित भूपेंद्र लीलाकांत कुलकर्णी यांच्यासह ११ पुरोहित मंत्रोचाराने मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गोकर्ण महादेव मंदिर व श्री संत सेना महाराज मंदिर समिती, साईबाबानगर, श्री संत सेनानगर, अक्षयनगर यांनी केले आहे.
गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव तसेच पावणेदोन महिन्यांपासून थांबलेला पाऊस शेतकरी व जनतेसाठी हानिकारक ठरत होता. शनिवारी गोकर्ण महादेव यांची प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक कार्यक्रम सुरू होताच सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहादा शहर व परिसरात वरुणराजाने वर्षाव केल्याने शेतकरी व नागरिक सुखावले आहेत.