विसरवाडीत रागाच्या भरात युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:55 IST2019-02-15T11:55:37+5:302019-02-15T11:55:43+5:30
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बसथांबा परिसरात 16 वर्षीय युवतीने संतापाच्या भरात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन ...

विसरवाडीत रागाच्या भरात युवतीची आत्महत्या
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बसथांबा परिसरात 16 वर्षीय युवतीने संतापाच्या भरात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
पोलीस सूत्रानुसार, मीनल रवींद्र अग्रवाल (16) रा.विसरवाडी ही आई-वडील व कुटुंबीयांसोबत येथील बसथांबा परिसरात राहते. ती येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. शाळेत नियमित जात नसल्याच्या कारणावरून तिचे वडील रवींद्र अग्रवाल व आई नंदिनी अग्रवाल यांच्याशी नेहमी मुलीचा वाद व्हायचा. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आई-वडिलांचा मुलीशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर ती वरच्या मजल्यावर खोलीत गेली व रागाच्या भरात वरच्या मजल्यावरील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब तिच्या लहान बहिणीच्या निदर्शनास आली व तिने याबाबतची माहिती आई-वडिलांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पोलीस नाईक प्रकाश गावीत यांनी घटनास्थळी भेट दिली. मीनलला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.पाडवी यांनी मृत घोषित केले. याबाबत तिचे वडील रवींद्र पुरणमल अग्रवाल यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश गावीत करीत आहेत.