बिबटय़ाच्या हल्ल्यात युवती ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:02 IST2019-07-29T13:02:05+5:302019-07-29T13:02:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेतियापासून नजीक असलेल्या भडगोन, ता.पानसेमल येथील शेतकरी ओंकार झामू चौहान यांच्या शेतातून घरी परतत ...

बिबटय़ाच्या हल्ल्यात युवती ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : खेतियापासून नजीक असलेल्या भडगोन, ता.पानसेमल येथील शेतकरी ओंकार झामू चौहान यांच्या शेतातून घरी परतत असताना 17 वर्षीय युवतीवर बिबटय़ाने हल्ला केल्याने ती ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
याबाबत वृत्त असे की, शनिवार, 27 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भडगोन शिवारात निंदणीचे काम करून मजूर घरी परतत होते. याचवेळी उसाच्या शेतातून आलेल्या बिबटय़ाने संगीता विजय आर्य (17) या युवतीवर मागून झडप घालून तिला घेऊन उसाच्या शेतात पलायन केले. मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. याबाबत वनविभाग व पोलिसांना तात्काळ माहिती दिल्यानंतर पोलीस व वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. उसाच्या शेतात शोध घेतला असता शेताच्या मध्यभागी संगीता ही रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. बिबटय़ाने तेथून पळ काढला होता. या घटनेत संगीताचा मात्र मृत्यू झाला.
या घटनेमुळे खेतिया व परिसरातील शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले असून बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. वनविभागातर्फे घटनास्थळाजवळ दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. वनविभागाचे कर्मचारी सतर्क राहून बिबटय़ाचा शोध घेत आहेत. यावेळी सेंधवा वनविभागाचे उपवनसंरक्षक केशवसिंह पट्टा, उपवनमंडळ अधिकारी नोरके, पानसेमल वनपरिक्षेत्र सहायक प्रदीप पवार, खेतिया वनपरिक्षेत्र सहायक भुरूखा, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, नीलेश पाटील, अनिल चौहान, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल उपस्थित होते.