रक्षाबंधनाला भाडेवाढीची भेट; ट्रॅव्हल्समधून प्रवास महागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:39+5:302021-08-21T04:35:39+5:30
नंदुरबार : कोरोनानंतर पूर्वपदावर येणाऱ्या सर्वसामान्यांना आता सणासुदीचे वेध लागले आहेत. यात दोन दिवसांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला असून, ...

रक्षाबंधनाला भाडेवाढीची भेट; ट्रॅव्हल्समधून प्रवास महागला!
नंदुरबार : कोरोनानंतर पूर्वपदावर येणाऱ्या सर्वसामान्यांना आता सणासुदीचे वेध लागले आहेत. यात दोन दिवसांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला असून, सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी खासगी ट्रॅव्हल्सची भाडेवाढही झाली असून, ही दरवाढ वाढलेल्या डिझेल दरांमुळे असल्याचा खुलासा ट्रॅव्हल्स चालक व मालकांनी केला आहे.
नंदुरबार येथून मुंबई, पुणे व गुजरात राज्यातील अहमदाबाद, बडोदा, सुरत या शहरांसाठी खासगी बस चालतात. कोरोनामुळे दीड वर्षात या बसची संख्या कमी झाली आहे. प्रवासी नसल्याने अनेकांनी आवरते घेत बस बंद केल्या आहेत. परिणामी आता रक्षाबंधनाला बस कमी आणि प्रवासी अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. डिझेलचे दरही वाढलेले असल्याने धुळे येथून संचलित होणाऱ्या सर्व बस मालकांनी तिकीट दर वाढवले आहेत.
ट्रॅव्हल्सची संख्या घटली
नंदुरबार शहरातून दीड वर्षापूर्वी ३० पेक्षा अधिक बस या पुणे, मुंबईकडे तर २० पेक्षा अधिक बस या गुजरात राज्यात जात होत्या. परंतु, गत दीड वर्षात ही संख्या निम्म्यावर आली आहे.
आज अखेरीस नंदुरबार ते पुणे यादरम्यान १२, मुंबईसाठी दोन तर अहमदाबादसाठी दोन अशा १४ खासगी ट्रॅव्हल्स प्रवास करत असल्याची माहिती आहे. १५ दिवसांपूर्वी यातील एक-दोन बस बुकिंगअभावी नंदुरबारातच मुक्कामी राहत असल्याचे चित्र होते.
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डिझेलमध्ये वाढ झालेली आहे. टॅक्स वाढलेले आहेत. बसचा दुरुस्ती तसेच इतर खर्च अधिक आहे. चालक व इतर सहायकांचे वेतन यासह अनेक अडचणी असल्याने या बसच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती नंदुरबारात ट्रॅव्हल्स बुकिंग सेंटर चालकाने सांगितले. गेल्या दीड वर्षात सातत्याने होणाऱ्या इंधन दराच्या वाढीने लांबचा प्रवास परवडत नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, नंदुरबार शहरातून तसेच जिल्ह्यातून सुटणाऱ्या बहुतांश खासगी बस या धुळे येथून चालवण्यात येतात. त्यामुळे त्याविषयीचा निर्णय तेथून घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.