शहाद्यात जखमी घारीला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:15 IST2020-07-29T13:15:14+5:302020-07-29T13:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पक्षी निवाऱ्यासाठी येतात. मंगळवारी सकाळी एक ...

शहाद्यात जखमी घारीला जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पक्षी निवाऱ्यासाठी येतात. मंगळवारी सकाळी एक घार जखमी अवस्थेत या संकुलात आढळून आली असता तिच्यावर योग्य औषधोपचार केल्यानंतर सुरक्षिततेसाठी वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
शहराच्या मध्यवर्ती भागात वसंतराव नाईक शैक्षणिक संकुल असून संस्थेने शाळेच्या इमारतीच्या परिसरात वृक्षारोपण केले असल्याने वर्षभर अनेक प्रकारचे पक्षी येथे येतात. पाखरांच्या चिवचिवाटाने हा परिसर गजबजलेला असतो. मंगळवारी सकाळी या परिसरात शाळेतील शिक्षकांना जखमी अवस्थेत एक घार आढळून आली. जखमी अवस्थेत घार असल्याने तिला उडता येत नव्हते. शाळेच्या कर्मचाºयाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ संस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव व उपस्थित शिक्षकांना सांगितल्यानंतर सर्वांनी जखमी अवस्थेत असलेली घार कार्यालयात आणून तिच्यावर मलमपट्टी केली प्यायला पाणी व खायला दाणे दिल्यानंतर वन विभागाला कळविले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्रपाल अनिल पवार व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमी घारेला वनविभागाच्या कार्यालयात आणले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घारीची प्रकृती स्थिर असून उपचाराअंती पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी दिली. या शैक्षणिक संकुलातील परिसरात यापूर्वीही अनेकदा जखमी खारुताई, कबूतर, कोकीळा, पोपट यांचे उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे. यावेळी प्रमोद जाधव, वनविभागाचे जितेंद्र पवार, विनायक पाटील, दिनेश निकुंभे, संस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, हिमांशू जाधव, प्रभू जाधव, मोते व राजेश राठोड उपस्थित होते.