उपसा योजना आता मार्गी लावाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:22 IST2021-02-10T13:22:51+5:302021-02-10T13:22:59+5:30

नरेंद्र गुरव लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासून ...

Get rid of clutter you don't need | उपसा योजना आता मार्गी लावाच

उपसा योजना आता मार्गी लावाच

नरेंद्र गुरव
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजमध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. मात्र दोन्ही बॅरेजवर असलेल्या २२ उपसा सिंचन योजना  बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना या पाण्याचा शेतीसाठी काहीही उपयोग होत नाही. जलसंपदामंत्री यांनी या बॅरेजेसची पाहणी उपसा योजनांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,  प्रकाशा व सारंखेडा येथे कोट्यवधी रुपये खर्च करुन बॅरेज उभारण्यात आले आहेत. मात्र या बॅरेजेसचा शेतकऱ्यांसाठी काहीच उपयोग  होत नसल्याने आजही शेतकरी पाण्यासाठी तहानलेलाच आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी भेटी देतात, पाहणी करतात, मात्र उपसा योजना कार्यान्वित होण्यासाठी काहीही हालचाल होत नसल्याने आजही या दोन्ही बॅरेजेसवरील २२ उपसा सिंचन योजना बंद आहेत. उपसा योजना कार्यान्वित होत नसल्याने ज्या उद्दिष्टाने हे बॅरेजेस उभारले आहेतते उद्दिष्ट मात्र अद्यापही सफल झालेले नाही. बॅरेजमध्ये साठवलेले पाणी दरवर्षी पावसाळा आला की सोडण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही बॅरेजेसवरुन पाणी उचलण्याची परवानगी घेतली आहे त्यातून फक्त ९०० ते एक हजार हेक्टर शेतजमिनीला फायदा होत आहे. या दोन्ही बॅरेजेसवरील उपसा योजना सुरू झाल्या तर सुमारे १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकाशा येथील बॅरेजच्या उद्घाटनाच्यावेळी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांनी बॅरेज पूर्ण झाल्यानंतर तापी खोरे विकास महामंडळाच्या सहाय्याने शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी देऊ, असे सांगितले होते. त्यानुसार तापी खोरे विकास महामंडळाने बॅरेज ताब्यात घेऊन सर्व उपसा योजना सुरू करून जर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवले तर ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असे प्रकाशा येथील केदारेश्वर उपसा सिंचन योजनेचे माजी अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितले.

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजवरील उपसा योजना
श्रीदत्त उपसा योजना सारंगखेडा,  हरितक्रांती उपसा योजना पुसनद, उत्तरतापी उपसा योजना बिलाडी, भद्रेश्वर उपसा योजना कोरीट,  केदारेश्वर उपसा योजना प्रकाशा,  सिद्धेश्वर उपसा योजना लहान शहादे, जनता उपसा योजना कोपर्ली,  विश्वतीर्थ उपसा योजना काकर्दे, राधेकृष्ण उपसा योजना हाटमोहिदे, देवकीनंदन उपसा योजना शिरुड, दीपकनाथ उपसा योजना समशेरपूर तर सारंगखेडा बॅरेजवर असलेल्या उपसा योजनांपैकी शहादा तालुक्यात तीन तर शिंदखेडा तालुक्यात आठ योजनांचा समावेश आहे. त्यात गायत्री उपसा योजना कळंबू, कामेश्वर उपसा योजना बामखेडा, रामकृष्ण उपसा योजना कहाटूळ, जय भवानी उपसा योजना निमगूळ, भाग्यलक्ष्मी उपसा योजना लंगाणे, रवीकन्या उपसा योजना लोहगाव,  विद्यावर्धिनी उपसा योजना धमाणे, आशापुरी उपसा योजना पाटण, मंदाने उपसा योजना दाऊळ, कमलताई पाटील उपसा योजना विरदेल, अक्कडसे उपसा योजना नेवाडे. या उपसा योजनांपैकी काहींचे काम अपूर्ण तर काहींचे कामच सुरू झाले नसल्याने त्या अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत.
 

Web Title: Get rid of clutter you don't need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.