तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST2021-06-26T04:21:54+5:302021-06-26T04:21:54+5:30

तळोदा : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत शहरातील घनकचऱ्याचा विषय नगरसेवकांनी उपस्थित करून दोन महिन्यांपासून ...

General meeting of Taloda Municipality | तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा

तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा

तळोदा : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत शहरातील घनकचऱ्याचा विषय नगरसेवकांनी उपस्थित करून दोन महिन्यांपासून रखडलेल्या टेंडर प्रक्रियेवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. दरम्यान, नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी या प्रकरणी लवकरच टेंडर प्रक्रिया राबविण्याचे सभेत सांगितले.

तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली होती. या व्हर्चुअल सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते. सभेत एकूण ३३ विषय कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आले होते. यात अमरधाम येथे गॅस शवदाहिनी बसविणे, डीबी हट्टीजवळील खर्डी नदीवरील जुना पूल तोडून नवीन पुलाचे बांधकाम करणे, डीबी हट्टीपासून अक्कलकुवा वळण रस्त्यापर्यंत डांबरीकरण व रस्ता दुभाजक व फूटपाथ तयार करणे, विद्यानगरीमधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे, नवीन वसाहतीतील गोपाळ नगर, मीरा कॉलनी, श्रेयस नगर, प्रताप नगर, श्रीराम नगर, यमुना नगर, गंगाई नगर, भिकाभाऊ नगर अशा १० नवीन वसाहतींच्या गटारी व रस्त्याची कामे करणे, अमरधाममध्ये मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे खरेदी करणे, शहरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणे, आमदार व खासदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयापासून समाधान चौक, कॉलेज चौफुली, चिनोदा रोड, बसस्थानक आदी ठिकाणी इलेक्ट्रिक पोल लाईट बसविणे, शहरातील नागरिकांसाठी दोन लाखांपर्यंतचा विमा काढणे. शिवाय वसाहतीमधील मोकळ्या जागा विकसित करून तेथे ओपन जीम बसविणे अशा ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे, परंतु शहरातील घनकचरा संकलनाबाबत नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी यांनी मुद्दा उपस्थित केला होता. कारण संबंधित ठेकेदारांची मुदत संपून तब्बल दोन महिने झाले आहेत अजूनही पालिकेमार्फत नवीन टेंडर प्रक्रिया घेण्यात आली नाही. तेव्हा नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी घनकचऱ्याचा प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे लवकरच टेंडरची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वसाधारण सभा व्हर्चुअल पद्धतीने घेतली होती. सभेचे संचलन मुख्याधिकारी सपना वसावा यांनी केले. सभेत उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, प्रतोत संजय माळी, गौरव वाणी, भास्कर मराठे, सुनयना उदासी, अंबिका शेंडे, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, रामानंद ठाकरे, सुरेश पाडवी, योगेश पाडवी, कल्पना पाडवी, अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, अमानुद्दीन शेख, हेमलाल मगरे व सुभाष चौधरी उपस्थित होते.

सभेसाठी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, विशाल माळी, सचिन पाटील, आश्विन परदेशी, राजेश पाडवी, गौरव चौधरी, मोहन माळी व नितीन शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल

शहरातील घनकचरा संकलनाचा प्रस्ताव नगरपालिकेने प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे दाखल केला आहे, परंतु त्यावर तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. कारण सध्या पावसाळा सुरू झाला आहे. साहजिकच कचरा संकलित होणे गरजेचे आहे. पालिकेच्या प्रस्तावात प्रशासकीय मान्यता मिळाली तरच पुढील टेंडरची प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

व्हर्चुअल मिटिंगबाबत तक्रार

पालिकेने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या व्हर्चुअल बैठकीबाबत नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांनी तक्रार केली आहे. या सभेत नगरसेवकांच्या संभाषणाबाबत सारखा गोंधळ झाला होता. एकमेकांचा संवाद समजत नव्हता याशिवाय अजेंड्यावर व कार्यालयीन टिप्पणीवर पालिकेचे अधिकारी हे नगरसेवकांची दिशाभूल करतात याबाबत वारंवार तोंडी सांगूनही कार्यवाही केली जात नसल्याने ठाकूर यांनी मुख्याधिकारी यांना तक्रार दिली.

नवीन वसाहतींच्या कामांचा ठराव

सभेत प्रतापनगर, गोपाळ नगर, मीरा कॉलनी, श्रेयस नगर, श्रीराम नगर, भिकाभाऊ नगर, गंगाई नगर, शर्मा नगर आदी १० नवीन वसाहतींमधील रस्ते व गटारींची कामे घेण्यात आल्याने वसाहतधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण या वसाहती स्थापन होऊन साधारण २५ वर्षे झाली आहेत. तरीही तेथे सध्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पालिकेने त्यांच्या विकासाचा ठराव घेतल्याने रहिवाशांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

शहरातील घनकचरा ठेक्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावर कार्यवाही सुरु असून, मान्यता मिळाल्यानंतर तातडीने टेंडर राबविण्यात येईल. - अजय परदेशी, नगराध्यक्ष, तळोदा

शहरात कचरा संकलनाअभावी प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी टेंडर प्रक्रिया हाती घ्यावी. - हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक नगरपालिका, तळोदा

Web Title: General meeting of Taloda Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.