माणुसकी म्हणून अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिला अन् पैसे गमावून बसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:37+5:302021-08-22T04:33:37+5:30
नंदुरबार : माणुसकी म्हणून कॉल लावण्यासाठी मोबाईल दिला आणि बॅंक खात्यातील पैसे गमावून बसला. आता ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे ...

माणुसकी म्हणून अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिला अन् पैसे गमावून बसला!
नंदुरबार : माणुसकी म्हणून कॉल लावण्यासाठी मोबाईल दिला आणि बॅंक खात्यातील पैसे गमावून बसला. आता ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे सायबर चोरटे वापरू लागले आहेत. त्यामुळे माणुसकी दाखविताना समोरचा खरंच गरजवंत आहे का याची पडताळणी करूनच ती दाखवा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
नेहमी वापरात असलेला मोबाईल नंबर अनेकजणांनी बॅंक खात्याला जोडलेला असतो. अशाच नंबरवरून फोन करण्याचा बहाण्याने सायबर चोरटे आपला हेतू साध्य करीत आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील गर्दी अशा ठिकाणी असे गरजवंत माझ्याकडे मोबाईल नाही, एक कॉल करू द्या म्हणून मोबाईल घेतात आणि क्षणार्धात ‘कारनामा’ करून मोकळे होतात हे स्पष्ट झाले आहे.
माणुसकी दाखवून कोणत्या अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल देऊ नये. फोन लावायचा आहे अशी बतावणी त्यांच्याकडून केली जाऊ शकते. फोन लावून द्यायचाच असेल तर स्वत: नंबर डायल करा, काही गडबड व शंका असल्याचे दिसताच लागलीच फोन कट करून डायल केलेला नंबर ब्लॅाक करा. त्यामुळे फसवणूक टळू शकते. अनोळखी व्यक्तीच्या कोणत्याही आमिषाला कधीही बळी पडू नका. गोड बाेलून आपली माहिती विचारुन आणि मोबाईल घेऊन आपली फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.