विमानाच्या इंधन दरांमागे धावतेय पेट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:16+5:302021-08-01T04:28:16+5:30
नंदुरबार : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने सर्वच जण हैराण आहेत. दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल दर ...

विमानाच्या इंधन दरांमागे धावतेय पेट्रोल
नंदुरबार : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने सर्वच जण हैराण आहेत. दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल दर हे एव्हीएशल टर्बईन फ्यूएल अर्थात विमानांच्या इंधनाच्या स्पर्धेत धावत असून एक दिवस दोघांचे दर सारखे तर नाही ना, होणार असा मिश्किल टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.
कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसताना दर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. प्रथमच १०० रुपयांच्या पुढे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असल्याने नागरिकांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. यातून अनेकांनी गरजेपुरतेच वाहन वापरणे सुरू केले आहे.
नोकरी किंवा इतर कामासाठी बाहेर जाताना पेट्रोलसाठी अधिक खर्च करावा लागतो. पूर्वी आठवड्यातून एकदा पेट्रोल भरायचो, आता तीन वेळा पेट्रोल पंपावर जावे लागते. इंधन दरवाढ ही महागाई वाढवणारी आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.
- सुभाष पाटील, नागरिक
कोरोनाच्या संकटामुळे लाॅकडाऊन झाले. यातून रोजगारावर गदा आली. त्यात आता पेट्रोल आणि डिझेलचे दर हैराण करणारे आहेत. या दरांमुळे खर्चात वाढ झाली आहे. आणि वाहनही गरजेचे आहे.
- प्रमोद पावरा, नागरिक
पाचशेच्या ठिकाणी लागतात आता आठशे रुपये
चारचाकी असलेले अनेक जण स्वत:चे वाहन वापरतात. परंतु डिझेलचे दर वाढले असल्याने त्यांना वाढीव खर्च येत आहे. ज्या ठिकाणी आधी ५०० रुपये लागत होते, त्या ठिकाणी २०० ते ३०० रुपये अधिक द्यावे लागत आहेत.