सनसिटी कॉलनीत आढळला गजरा सर्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:09 IST2020-04-29T16:09:14+5:302020-04-29T16:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सध्या लॉकडाऊनच्या काळात वन्य प्राणी तसेच पशुपक्षी स्वतंत्र्यपणे वावरत आहेत आणि त्यातच नंदुरबार शहरातील ...

Gajra snake found in Suncity Colony | सनसिटी कॉलनीत आढळला गजरा सर्प

सनसिटी कॉलनीत आढळला गजरा सर्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सध्या लॉकडाऊनच्या काळात वन्य प्राणी तसेच पशुपक्षी स्वतंत्र्यपणे वावरत आहेत आणि त्यातच नंदुरबार शहरातील सनसिटी कॉलनीतील रहिवाशी राजेंद्रकुमार गावीत याच्या घरात दीड ते दोन फुटाचा साप आढळून आला. याप्रसंगी गावीत यांनी तत्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य जितेंद्र सांगळे याना फोन केला.
जितेंद्र सांगळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे असलेला साप हा दुर्मिळ प्रजातीचा गजरा (बिनविषारी) असल्याचे सांगितले. सर्पमित्र सांगळे यांनी या गजरा सापाला पकडून वन विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
गजरा साप हा बिनविषारी असून, त्याची लांबी दोन ते तीन फूट असते, गजरा साप आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे. या सापाच्या शरीरावरील खवले अत्यंत गुळतगुळीत असतात. त्यामुळे जमिनीखालच्या दगडांमधून व अरूंद बिळांमधून सहजसुलभ हालचाल करता येते. याचा रंग तपकिरी, काळपट असतो, गडद तपकिरी रंगावर तोंडापासून एक तृतीयांश भागापर्यंत पुसट पांढरी नक्षी असते. हा साप लाजाळू असून सहसा चावत नाही.
शहरात कोणत्याही प्रकारचा साप आढळून आल्यास त्याला मारू नये. त्यावर लक्ष ठेवून त्वरित सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सांगळे यांनी केले. सापाला मारण्याचा प्रयत्न केल्यास शासनाकडून अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात येते.

Web Title: Gajra snake found in Suncity Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.