गड्या ते सुंदर दिन हरपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:12 IST2020-11-20T12:12:27+5:302020-11-20T12:12:34+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  माणूस कितीही मोठा झाला तरी गावाकडचा बालपणीचा मित्र भेटल्यावर बालमन जागे होतेच आणि पद-प्रतिष्ठा ...

Gadya lost that beautiful day ... | गड्या ते सुंदर दिन हरपले...

गड्या ते सुंदर दिन हरपले...

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  माणूस कितीही मोठा झाला तरी गावाकडचा बालपणीचा मित्र भेटल्यावर बालमन जागे होतेच आणि पद-प्रतिष्ठा विसरुन बालमित्रांसोबत जुन्या आठवणीत रमतो. असाच काहीसा अनोखा अनुभव जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंदाच्या दिवाळीत घेतला. त्यांनी आपल्या बालमित्रांसोबत शेतात ऊस खाताना अर्थात ‘शुगरकेन पार्टी’चा सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो लक्षवेधी ठरला आहे.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड हे मूळचे सामोडे, ता.साक्री येथील रहिवासी. नंदुरबारपासून हे गाव जवळच असल्याने अनेक वर्षानंतर त्यांनी यंदाची दिवाळी आपल्या गावीच साजरी केली. गावी गेल्यावर साहजिकच बालपणीच्या मित्रांसोबत बालपणीच्या आठवणी, मस्ती आल्याच. त्याचाही त्यांनी अनुभव घेतला. त्यांचे तेव्हाचे बालमित्र मोत्या, कोत्या, जन्या, बाबड्या हे शाळेत खूप काही शिकू शकले नाहीत. त्यामुळे ते गावातच राहिले आणि आज शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. डॉ.भारुड हे पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालयात गेले आणि शिक्षणाबाबत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. थेट आयएएस होऊन जिल्हाधिकारी झाले. पण गावात गेल्यानंतर बालमित्रांसाठी ते जिल्हाधिकारी नव्हे तर बालपणीचे ‘राजू’च राहिले. आजही ते मित्र त्यांना त्या नावानेच हाक मारतात. 
यंदाच्या दिवाळीत हे सर्व मित्र एकत्र आले आणि शेतातही फेरफटका मारला. विशेष म्हणजे बालवयात ते एकत्र ऊस खात होते. या दिवाळीतही त्यांची ही ‘शुगरकेन पार्टी’ खूप रंगली होती.  ऊस खाताना बालपणीच्या आठवणीत ते हरपले आणि एक वेगळ्या विश्वाचा आनंद त्यांनी लुटला.
या संदर्भात जिल्हाधिकारी डाॅ. भारूड यांनी स्वत: सोशल मिडियावर फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मिडियात पसंत केले जात आहेत. धुळे-नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच देशभरातून या फोटांना पसंती दिली जात आहे. 
 डाॅ. भारूड यांच्या संघर्षमय प्रवास सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे हे फोटो खूप काही वेगळेपण सांगणारे ठरले आहेत. 

Web Title: Gadya lost that beautiful day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.