नंदुरबार स्वतंत्र जिल्हा बँकेचे भवितव्य अधांतरीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:04+5:302021-09-02T05:06:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मितीला २३ वर्षे झाले असली तरी अद्याप स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक अस्तित्वात ...

नंदुरबार स्वतंत्र जिल्हा बँकेचे भवितव्य अधांतरीतच
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मितीला २३ वर्षे झाले असली तरी अद्याप स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक अस्तित्वात आलेली नाही. सध्या स्वतंत्र बँक स्थापनेचा रेटा वाढत असताना धुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने धुळे जिल्हा बँकेतून विभाजन होऊन स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक अस्तित्वात येईल की नाही याबाबत जिल्ह्यातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, यासाठी आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर नंदुरबार व धुळे जिल्हा एकत्रित असताना सुरू असलेल्या धुळे जिल्हा बँकेचेही विभाजन होऊन स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक स्थापन व्हावी अशी मागणी होती. सुरुवातीच्या काळात ही मागणी दबक्या स्वरूपात सुरू होती; मात्र मध्यंतरीच्या काळात धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर खालावली होती. त्यामुळे बँकेचे विभाजन योग्य नसल्याचे शासनाचे मत होते; मात्र आता ही बँक रुळावर आली आहे. त्यामुळे स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक स्थापन व्हावी यासाठी पुन्हा रेटा वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे ६५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या बँकेशी संबंध आहे. या शेतकऱ्यांना व बँकेशी निगडीत इतर नागरिकांनाही स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक झाल्यास सुविधा व बँक व्यवहार अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. आजच्या स्थितीत धुळे जिल्हा बँकेत नंदुरबार जिल्ह्याची थकबाकीही कमी आहे. त्यापेक्षा धुळे जिल्ह्याची थकबाकी अधिक आहे. जिल्हा बँक स्वतंत्र झाल्यास नंदुरबार जिल्हा बँकेची स्थिती चांगली राहणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या बँकेच्या एकूण १७ संचालकांच्या जागा असून, त्यापैकी नंदुरबार जिल्ह्याच्या वाट्याला केवळ सात संचालक येतात. धुळे जिल्ह्यात संचालकांचे बहुमत अधिक असल्याने निर्णय प्रक्रियेतही बँकेवर धुळे जिल्ह्याचाच दबदबा असतो, असे येथील काही संचालकांचे मत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा बँक व्हावी यासाठी आता काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. माजी आमदार व शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँकेसाठी पाठपुरावा सुरू केला असून, त्यांनी यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री व संबंधित विभागाशी पाठपुरावा केला आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र बँक स्थापण्याबाबत प्राथमिक संकेतही मिळाले आहेत. असे असताना नुकतीच धुळे जिल्हा बँकेची निवडणूक तयारी सुरू झाली असून, त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी १० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत असून, १९ सप्टेंबरला हरकतीवर सुनावणी होणार आहे आणि अंतिम मतदार यादी २४ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, निवडणुकीची प्रक्रिया पुढे सरकण्यापूर्वी स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँक स्थापण्याबाबत निर्णय होतो की बँकेचे विभाजन न होता निवडणूक होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सध्याच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देऊन बँक विभाजनाची प्रक्रिया सुरू करावी व स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँकेची स्थापना करावी, अशी आपली मागणी आहे. त्यासंदर्भात संबंधितांशी भेटही आपण घेतली असून, राज्य शासनाने रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठविण्याचे संकेत दिले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनीही एकत्र येण्याची गरज असून, लवकरच याबाबत आपण बैठकही बोलावणार आहोत. - चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना नेते, नंदुरबार