एसटीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहक अन् चालकांचे प्रवासी ऐकेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:37+5:302021-06-24T04:21:37+5:30

नंदुरबार : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. प्रवाशांसह चालक व वाहकांनाही मास्क व ...

The fuss of social discrimination in ST; Passengers not listening to carriers! | एसटीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहक अन् चालकांचे प्रवासी ऐकेनात !

एसटीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहक अन् चालकांचे प्रवासी ऐकेनात !

नंदुरबार : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. प्रवाशांसह चालक व वाहकांनाही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही सेवा सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची सत्यता ‘लोकमत’ने पडताळण्यासाठी नंदुरबार ते शहादा असा प्रवास केला. या दरम्यान चालक - वाहक मास्कचा वापर करत असले तरी प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून आले.

‘लोकमत’ प्रतिनिधीने नंदुरबार ते शहादा असा प्रवास केला असता अनेक बाबी समोर आल्या. काही जागरूक प्रवासी तोंडाला मास्क लावून प्रवास करत होते तर ग्रामीण भागातून चढणाऱ्या अनेकांना मास्कच नसल्याचे यावेळी दिसून आले. एसटीकडून सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस सॅनिटाईज करण्यात येत असल्याचे तसेच केवळ सीट तेवढेच प्रवासी बसविण्याचे धोरण एसटीने अवलंबल्याचे सांगण्यात आले. परंतु गाड्यांमध्ये स्वच्छतेबाबत उदासीनता असल्याचे दिसून आले. एका सीटवर एकऐवजी दोन प्रवासी बसवले जात होते. बसेस सुरू झाल्याने ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले अनेकजण उपाययोजनांविनाच प्रवास करत असल्याचे दिसून आले. प्रवास करणारे पुरुष बसमध्ये चढल्यानंतर रुमाल बांधत होते, तर काही महिलांनी साडीचा पदर तोंडाला बांधून घेत कोरोनाचा मुकाबला करत असल्याचे दर्शवून दिले होते.

नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेसमध्ये मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मास्क असेल तरच प्रवाशांना प्रवेश दिला जात असल्याचे सांगण्यात आले. शहादा आगारातूनही हेच सांगण्यात आले. परंतु बसमध्ये बसल्यावर प्रवासी मास्क काढून बसत असल्याचे समोर आले. बसमध्ये गुटखा खावून थुंकणे, बसबाहेर थुंकण्याचे प्रकारही कायम आहेत.

बसस्थानकांमध्ये फलाटावर येणारी बस थांबवण्यापूर्वी गर्दी करण्याचे प्रकारही पुन्हा सुरू झाल्याचे दृश्य सध्या बसस्थानकांमध्ये दिसून आले.

जगतापवाडी

नंदुरबार शहरातून बस सुटल्यानंतर शहाद्याकडे मार्गस्थ झाली. बाजार समिती मार्गाने जगतापवाडी येथे आल्यानंतर बसमध्ये एक प्रवासी येथून चढले. त्यांनी मास्कचा वापर केल्याचे दिसून आले. परंतु सॅनिटायझर नव्हते. मास्क लावून प्रवासी जागेवर जाऊन बसले.

करण चाैफुली

उड्डाणपूल मार्गाने बस करण चाैफुलीवर आल्यानंतर याठिकाणी पाच प्रवासी बसमध्ये चढले. या प्रवाशांनी मास्कचा वापर केला होता. त्यांच्याकडून बसमध्ये बसण्याच्या जागी सॅनिटायझरचा वापर मात्र केला गेला नाही. एका सीटवर दोघे बसून होते.

प्रकाशा

नंदुरबार ते शहादादरम्यान प्रकाशा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. येथे सहाजण उतरले तर चार जण बसमध्ये बसले. यात दोन महिला होत्या. त्यांच्याकडून मास्क लावण्यात आला असला तरी एकमेकींशी बोलताना तो मास्क काढून बोलत होत्या.

डामरखेडा

येथून दोन प्रवासी शहाद्याकडे जाण्यासाठी बसले. यातील एकाने मास्क लावला नव्हता. बसमध्ये आल्यावर चालकाने सूचित केल्यानंतर हातरुमाल बांधून घेतला. यावेळी बसमधील काहींनी तोंडावर लावलेला मास्क काढून घेतल्याचे दिसून आले.

वाहकाचा प्रवासात पूर्णवेळ मास्क

नंदुरबार ते शहादा अशी बस नेणाऱ्या वाहकाने पूर्णवेळ मास्क लावल्याचे दिसून आले. चालकाकडून बसमध्ये चढणाऱ्यांना मास्क लावण्याचे सांगण्यात येत होते. प्रवाशांच्या जागेवर जाऊन तिकीट काढतानाही वाहकाने मास्क लावला होता. विशेष म्हणजे वाहक जागेवर जाऊन बसल्यानंतर त्याने खिशातून सॅनिटायझर काढत हात स्वच्छ केले.

प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

एकीकडे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन करण्यात येत असताना, दुसरीकडे प्रवाशांकडूनही नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. बसमध्ये मास्क काढून काही जण बसले असताना शहादा स्थानकात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नंदुरबारहून येणारी गाडीच परत जाणार असल्याने त्यात काही जण गर्दी करत होते. बसमध्ये चढतानाही गर्दी झाल्याचे दिसून आले.

चालकांना मास्क लावण्यात अडचणी

नंदुरबार ते शहादा हे अंतर साधारण एक तासाचे आहे. यादरम्यान एसटी विविध प्रवाशी थांब्यांवर थांबते. एसटीकडून चालकांना मास्क सक्तीचा केला आहे. चालक मास्कही लावत आहेत. परंतु बस चालवताना मात्र तो काढण्याचे प्रकारही होत आहेत. नंदुरबार ते शहादा प्रवासादरम्यान चालकाने एका तासात तीन वेळा मास्क काढल्याचे दिसून आले. एसटीचे केबिन हवेशीर नसल्याने मास्क काढून घाम पुसत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: The fuss of social discrimination in ST; Passengers not listening to carriers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.