लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी अंबाबारी ता.अक्कलकुवा आणल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबाबारी येथे शेकडोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिवसभर चुली बंद ठेवून सिताबाईंना श्रध्दांजली वाहिली. सीताबाई ह्या विस्थापितांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी लढत होत्या. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अंत्ययात्रेत लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, माजीमंत्री पद्माकर वळवी यांच्यासह जिल्हाभरातून नागरीक सहभागी झाले होते. दिल्ली येथे केंद्रशासनाच्या शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या दोन महिनंपासून शेतकरीच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लोक संघर्ष मोर्चाचे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याच आंदोलनात आंबाबारी सीताबाई रामदास तडवी लोकसंघर्षतर्फे सहभागी होत्या. त्या कार्यकर्त्यांसह शाहजहाँपुर बॉर्डर वर आंदोलन करीत होत्या. प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेडमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. परेड संपल्यानंतर त्या कार्यकर्त्यांसोबत गावाकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यातच रेल्वे स्थानकावर येताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री विशेष रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह अक्कलकुवा तालुक्याकडे रवाना करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी अंबाबारी येथे आणल्यानंतर गावातील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताबाई यांच्या अचानक निधनाने ग्रामस्थांनी एक दिवसाचा उपवास करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सीताबाई यांच्या पश्चात पती, मुलगा व चार मुली असा परिवार आहे.
विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली
- मयत सीताबाई यांना विधानसभेच्या उपाध्यक्ष निलम गो-हे यांनीही पाठवलेल्या श्रद्धांजली अर्पण करत त्यांचे बलिदान वाया जाणार नसल्याचे म्हटले आहे.
- सीताबाई यांना देशभसह सयूंक्त किसान मोर्चा अखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती महाराष्ट्र आणि विविध राज्यातील किसान संघटनांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली. कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजू शेट्टी, पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, गजानन खातू पूर्णिमा, चिकरमाने सुभाष वारे यांनीही शोकसंदेश दिले होते. राज्यातील विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही शोक संदेश पाठवले होते.