नवापूर तालुक्यात रस्ता कामासाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:21+5:302021-05-11T04:32:21+5:30
नंदुरबार : केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत तालुक्यातील धायटे भागापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या १४ किलोमीटरच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ...

नवापूर तालुक्यात रस्ता कामासाठी निधी मंजूर
नंदुरबार : केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत तालुक्यातील धायटे भागापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या १४ किलोमीटरच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाकडून चार कोटी ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार शिरीष नाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याच्या फलस्वरूप म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही मंजुरी दिली आहे.
धायटे भागातील करंजवेल, सुकवेल, डोकारे, बिलबारा, भरडू, केळी ते तिळासर येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा आवश्यक होती. विशेष करून आदिवासी सहकारी साखर कारखान्यापर्यंत ऊस घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी सोय व्हावी म्हणून आमदार शिरीष नाईक यांनी या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चार कोटी ४५ लाख ६५ हजार रुपये मंजूर केले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाचा मोठा टप्पा पार करून ऊसाने भरलेली वाहने डोकारेपर्यंत येत होती. नव्याने सुधारणा घडवून रस्त्याची उभारणी झाल्यावर कोंडाईबारी व लगतच्या भागातील वाहने महामार्ग व्यतिरिक्त या रस्त्याचा वापर करून डोकारेपर्यंत येऊ शकणार आहेत. महामार्गावर अकस्मात काही घडल्यास हा मार्ग पर्यायी ठरणार आहे. धायटे भागातील रस्त्याच्या या सुधारणेमुळे नजीकच्या काळात मोठी सोय होणार आहे. तालुक्यातील रस्ते नाशिक विभागात सर्वाधिक चांगले रस्ते म्हणून ओळखले जातात. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची मोठी पडझड झाल्याने रस्त्यांचा दर्जा पूर्ववत राखला जावा, यासाठी आमदार शिरीष नाईक प्रयत्नशील आहेत. राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आमदार शिरीष नाईक यांनी प्रयत्न चालवले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चार कोटी ४५ लाख ६५ हजार रुपये मंजूर केल्याने आमदार शिरीष नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या सुधारणेची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.