सिव्हिलमध्ये तज्ञांचा कोरम फुल्ल; पण ग्रामीण रुग्णालयात मात्र वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST2021-02-20T05:32:34+5:302021-02-20T05:32:34+5:30
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सध्या तीन स्त्री रोग तज्ञ, तीन सर्जन, बालरोग तज्ञ, दोन अस्थिरोग तज्ञ, दोन मानसोपचार तज्ञ, तीन ...

सिव्हिलमध्ये तज्ञांचा कोरम फुल्ल; पण ग्रामीण रुग्णालयात मात्र वानवा
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सध्या तीन स्त्री रोग तज्ञ, तीन सर्जन, बालरोग तज्ञ, दोन अस्थिरोग तज्ञ, दोन मानसोपचार तज्ञ, तीन भूलतज्ञ, एमडी मेडिसीन तज्ञ, नेत्रतज्ञ, एक कान, नाक, घसा तज्ञ तर आठ वैद्यकीय अधिकारी काम पाहत आहेत. जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांची संख्या वाढीव असल्याने गर्भवती मातांच्या प्रसूतीच्या अडचणी दूर झाल्या आहेत. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात एक बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ यांची नियुक्ती आहे. तळोदा उपजिल्हा रुग्णालयात मात्र एकच स्त्रीरोग तज्ञ आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये तर १३ ग्रामीण रुग्णालये आहेत. यात नंदुरबार आणि धडगाव येथील महिला रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार आणि नवापूर येथील रुग्णालयांमध्ये तज्ञ डाॅक्टर्स गेल्या काही काळात नियुक्त करण्यात आल्याने रुग्णांना विविध उपचार वेळीच मिळत आहेत. परंतु याउलट ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा भरणा करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. प्रशासनाने पाठपुरावा करुनही वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांची पदे भरली गेलेली नाहीत. याकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील पदभरतीमुळे होणार फायदा
जिल्ह्यात नुकतेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञानदान करण्यासाठी तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. यातील काही जण रुग्णसेवाही बजावणार आहेत. नुकतेच एमडी मेडिसिन या शाखेत तज्ञ असलेले दोन डाॅक्टर्स महाविद्यालयात रुजू झाले आहेत. त्यांच्याकडून रुग्णांच्या तपासण्या नित्यनेमाने करण्यात येत असल्याने दैनंदिन ओपीडीवरचा ताण कमी झाला आहे. तसेच आयसीयूमध्येही डाॅक्टर्स उपलब्ध झाले आहेत. येत्या काळात आणखी तज्ञ डाॅक्टर्स सेवा देण्यासाठी रुजू होणार असल्याने जिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढणार असल्याची माहिती दिली जात आहे.
जिल्हा रुग्णालयातील सर्व कक्षांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. चांगल्याप्रकारे सेवा देण्यात येत आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न होता. पदभरतीमुळे हा प्रयत्न सफल होत आहे. येत्या काळात वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर रुग्णांसाठी तज्ञ डाॅक्टरांचा ताफा उपलब्ध होणार आहे.
-डाॅ. के.डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक,नंदुरबार.