अवैध वाळू वाहणारे चार ट्रॅक्टर जप्त साडेपाच लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:59 IST2020-06-08T11:59:42+5:302020-06-08T11:59:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील तापी गोमाई नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर ...

Four tractors carrying illegal sand seized, fined Rs 5.5 lakh | अवैध वाळू वाहणारे चार ट्रॅक्टर जप्त साडेपाच लाखांचा दंड

अवैध वाळू वाहणारे चार ट्रॅक्टर जप्त साडेपाच लाखांचा दंड


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील तापी गोमाई नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागामार्फत जप्त करण्यात आल्या असून प्रत्येकी एक लाख १५ हजार रुपये असा एकूण पाच लाख ६० हजार रुपये आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यांविरोधात तालुक्यात महसूल विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
शनिवारी रात्रीच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात टेंभेतर्फे सारंगखेडा येथे दोन वाळू ट्रॅक्टर तसेच गोमाई नदीपात्रात डामरखेडा येथे दोन असे एकूण चार वाळू तस्करी करणाºया ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाने जप्त केल्या आहेत. तालुक्यात शासनामार्फत वाळू घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नसताना अनेक वाळूतस्करांनी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील तापी व गोमाई या प्रमुख नद्यांसह इतर नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू ठेवली आहे. वाळू तस्करांच्या या कारणांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महसूल विभागाने वाळू प्रकरण विरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महसूल विभागाच्या पथकात तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, अव्वल कारकून प्रदीप पाटील, तलाठी लक्ष्मण कोळी, पोलीस कर्मचारी होते. कारवाईनंतर ही वाहने सारंगखेडा येथील पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली. या कारवाईदरम्यान पथकाला दोन बेनामी दुचाकी आढळून आल्या असून त्यांची चौकशी करून शोध घेण्याबाबत व कारवाई करण्याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले आहे.
दोन्ही नदीपात्रात महसूल विभागाचे विशेष पथक रात्रीच्या सुमारास कार्यरत करण्यात आले होते. या पथकाने सुमारे सहा ते सात किलोमीटर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरवर बसून फिल्मी स्टाईलने वाळू तस्करांची घटनास्थळी जप्ती केली आहे. प्रशासनातर्फे अचानक कारवाई सुरू झाल्याने नदीपात्रातील अनेक ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. टेंभातर्फे सारंगखेडा व डामरखेडा येथील कारवाईत चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला सुमारे एक लाख १५ हजार रकमेच्या दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

 

Web Title: Four tractors carrying illegal sand seized, fined Rs 5.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.