चार महिन्यात कुपोषित बालकांची संख्या चार पटीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:29 IST2020-09-09T12:29:26+5:302020-09-09T12:29:42+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांपर्यंत अमृत आहार योजनेतील आहार तब्बल दोन ते तीन ...

चार महिन्यात कुपोषित बालकांची संख्या चार पटीने
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांपर्यंत अमृत आहार योजनेतील आहार तब्बल दोन ते तीन महिने उशिरा पोहोचल्याने शिवाय लसीकरण व बालकांची आरोग्य तपासणी मोहीम रखडल्याने गेल्या चार महिन्यात कुपोषित बालकांची संख्या तब्बल चारपटीने वाढली आहे. आधीच कुपोषणाबाबत चर्चेत असलेल्या जिल्ह्यासाठी ही गंभीर बाब असून त्याबाबत धडक उपाययोजना आवश्यक आहेत.
मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा, अंगणवाड्या बंदच होत्या. अंगणवाड्यांमधील बालकांना घरीच पोषण आहार देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. बालकांची दर महिन्यात आरोग्य तपासणी केली जाते. शिवाय काही ठराविक कालावधीनंतर लसीकरणही केले जाते. अंगणवाड्यांमध्ये त्यांचे नियमित वजनही घेतले जाते. पण लॉकडाऊनमुळे हे सर्व थांबले होते. त्यासंदर्भात लोकांच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने घरीच बालकांचे वजन घेणे व आरोग्य तपासणीचे नियोजन केले होते. परंतु ते नियोजनही विस्कटले. दरम्यानच्या काळात अमृत आहार वाटपासंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू झाल्या. त्याच्या चौकशीनंतर आहारच वाटप झाला नसल्याचा प्रकार उघडकीस आला. या योजनेचा ठेका बाहेरील ठेकेदाराला दिला गेल्याने आहाराच्या वाटपास विलंब झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. प्रत्यक्षात या सर्व प्रकरणाला तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटल्याने आदिवासी दुर्गम भागातील कुपोषण वाढत गेल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग व युुनिसेफने संयुक्तपणे नुकतीच कुपोषित बालकांच्या शोधमोहिमेसाठी विशेष धडक मोहीम राबवली. ही मोहीम अतिशय नियोजनपूर्वक राबविण्यात आल्याने राज्यानेही त्याचे कौतुक केले असून या मोहिमेनुसार राज्यभर कुपोषित बालकांची शोधमोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या जवळपास चारपटीने वाढल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात एक हजार ६३ अतितीव्र कुपोषित बालके होती तर सहा हजार १०४ मध्यम तीव्र कुपोषित बालके होती. ही संख्या जुलैअखेर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या तीन हजार ३९१ तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या १८ हजार २५९ पर्यंत गेली आहे.
सर्वाधिक धडगाव तालुक्यात हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. या तालुक्यात मार्च महिन्यात ३५४ अतितीव्र कुपोषित बालके होती. ती जुलै महिन्यात ९६८ झाली. तर शहादा तालुक्यात मार्च महिन्यात १८९ अतितीव्र कुपोषित बालके होती. ती जुलै महिन्यात ८२९ झाली. त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
४नंदुरबार जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये एकूण शून्य ते सहा वयोगटातील एकूण एक लाख ५६ हजार २२८ बालके होती. त्यात अतितीव्र कुपोषित एक हजार ६३ म्हणजे ०.६८ टक्के तर मध्यम तीव्र कुपोषित सहा हजार १०४ म्हणजे ३.९१ टक्के होती. एकूण बालकांच्या संख्येत तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांची टक्केवारीचा विचार केल्यास ती ०.४ टक्के होती.
४जुलैअखेर एकूण स्क्रिनींग झालेल्या बालकांची संख्या एक लाख ४५ हजार ८४७ होती. त्यात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या तीन हजार ५९१ म्हणजे २.४६ टक्के आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या १८ हजार २५९ म्हणजे १२.५२ टक्के झाली. एकूण बालकांच्या संख्येत जुलैमध्ये असलेल्या अतितीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची टक्केवारीचा विचार केल्यास ती १४.९८ टक्के होती. जी चिंताजनक आहे.