पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार (क्रमांक जीजे ०६ सीएम २८३६) नंदुरबारहून दोंडाईचाकडे जात असताना समोरून येणारी ॲपे रिक्षा (क्रमांक एमएच १८ -टी २३७) हॉटेल तृप्तीकडे वळण घेत असताना अपघात झाला. ॲपेरिक्षात हॉटेल तृप्तीचा किराणा माल भरलेला होता. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे तर कार रस्त्याचा कडेला जाऊन उलटली. रिक्षामधील सर्व किराणा सामान रस्त्यावर पडलेला होता. तसेच जखमींचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे रस्त्यावर दिसून आला. अपघात होताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत करून दोंडाईचा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.
नंदुरबार तालुक्यातील न्याहली गावातील नाकाबंदी करणारे पोलीस कर्मचारी नितीन मराठे व होमगार्ड कैलास धनगर यांनी घटनास्थळी मदत केली. त्यानंतर नंदुरबार तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. रिक्षाचालक चंदू मराठे, एक महिला, एक लहान बालक व कार चालक असे चार जण या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दोंडाईचा येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.