लाकूडसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:40 IST2020-09-19T12:40:19+5:302020-09-19T12:40:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर वन विभागाच्या पथकाने अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन व लाकूड मिळून चार ...

लाकूडसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर वन विभागाच्या पथकाने अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन व लाकूड मिळून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. साग व शिसम प्रजातीच्या चौपाटाची अवैध वाहतूक केली जात होती.
वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाचे पथक घेऊन शासकीय वाहन व खाजगी मोटारसायकलने त्यांनी संशयीत वाहनाचा पाठलाग केला. राष्ट्रीय महामार्गावर सावरटफाटा येथे रस्त्यावर जीप (क्रमांक जी.जे.१६ एए- ०६७४) चालक वाहन सोडून पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या वाहतूक होत असलेले साग व शिसम चौपाट भरलेले आढळून आले. घटनास्थळावर पंचनामा करुन मुद्देमालासह वाहन नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले. तेथे जप्त मुद्देमालाचे मोजमाप घेतले असता साग व शिसम चौपाटाचे एकुण ८१ नग मिळून आले. घटनेबाबत नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी प्रथम गुन्हा नोंद केला. जप्त मुद्देमाल व वाहनाची एकुण अंदाजे किंमत चार लाख रुपये आहे. या कारवाईत प्रथमेश हाडपे, वनपाल डी.के. जाधव, ए.एन. चव्हाण, वनरक्षक प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, सतीश पदमोर, लक्ष्मण पवार, संतोष गायकवाड, संजय बडगुजर, कमलेश वसावे, नितीन पाटील व अशोक पावरा यांनी सहभाग घेतला. पुढील तपास उपवनसंरक्षक नंदुरबार विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे व सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वडकळंबीचे वनपाल डी.के. जाधव हे करीत आहेत.