राज्याचा फॉर्म्यूला जि.प.निवडणुकीतही अंमलबजावणी बाबत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:06 PM2019-12-12T12:06:53+5:302019-12-12T12:06:59+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू ...

Formula for preparation of implementation of State formula in GP elections | राज्याचा फॉर्म्यूला जि.प.निवडणुकीतही अंमलबजावणी बाबत तयारी

राज्याचा फॉर्म्यूला जि.प.निवडणुकीतही अंमलबजावणी बाबत तयारी

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली असून सर्वांनीच प्राथमिक मेळावे व इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. एकुणच जिल्ह्यातील राजकीय स्थिती पहाता विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षांतरामुळे आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे राजकीय नेत्यांची मोठी गोची झाली आहे. अशा स्थितीत राज्यातील महाविकास आघाडीचाच फार्म्यूला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने अमंलबजावणीबाबत प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या एकुण ५६ गट आणि सहा पंचायत समितींच्या ११२ गणांच्या निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतरासाठी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष मुंबईकडेच होते. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतरही सर्वच पक्षांमध्ये शांततेचे वातावरण होते. आता गेल्या दोन, तीन दिवसांपासून सर्व नेते सक्रीय झाले आहेत. भाजपने मेळावा व मुलाखती घेवून आघाडी घेतली. या पक्षातर्फे जिल्हा परिषदेसाठी १८७ व पंचायत समितीच्या गणांसाठी २६५ उमेदवारांनी मुलाखती दिल्याचे पक्षाचे म्हणने आहे. अर्थातच उमेदवारीसाठी अनेक गट, गणांमध्ये पक्षांतर्गतच स्पर्धा राहणार असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती काही गट आणि गणांमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादीचीही आहे. या तिन्ही पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाले. त्यात सर्व गटात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी काही प्रमुख नेते मात्र राज्याप्रमाणेच महाविकास आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. कारण चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार तालुक्यात काँग्रेस खिळखिळी झाली आहे. तर राजेंद्र गावीत यांनी भाजप प्रवेश केल्याने शहादा तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. दिपक पाटील यांनीही भाजप मध्ये प्रवेश केल्याने शहादा तालुक्यात काँग्रेसची शक्ती कमी झाली आहे. नवापूर तालुक्यातून भरत गावीत यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने या तालुक्यातही काही गटांमध्ये काँग्रेस कुमकूवत आहे. शिवसेना नंदुरबार आणि अक्कलकुवा वगळता इतर चार तालुक्यांमध्ये फार काही प्रभावी नाही. अशा स्थितीत काँग्रेस, शिवसेना व राष्टÑवादी या तिन्ही पक्षांना आघाडी करणे भागच पडणार असल्याचे कार्यकर्त्यांचेही म्हणने आहे. शिवाय ही आघाडी झाल्यास पूर्वाश्रमीचे सर्व नेते एकत्र येणार असल्याने राजकीय सूरही त्यांचा जुळेल अशाही प्रतिक्रीया आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी करून निवडणूक लढवतील असे प्राथमिक चित्र आहे.
दुसरीकडे भाजपने निवडणुकीची जबाबदारी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्यावर सोपविल्याने एरव्ही पक्षाच्या बैठकांमध्ये फारसे सक्रीय न दिसणारे डॉ.विजयकुमार गावीत गेल्या दोन दिवसांपासून मुलाखतींसाठी ठाण मांडून होते. मुलाखतीसाठी इच्छुकांच्याही चांगला प्रतिसाद दिसून आला. तर काँग्रेसच्या पहिल्याच मेळाव्यात झालेली गर्दी लक्षवेधी होती. आता याच मेळाव्याच्या धर्तीवर शिवसेनेचाही चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत १४ डिसेंबरला पुन्हा मेळावा होणार आहे. त्यात शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
एकीकडे महाविकास आघाडीची चर्चा सुरू असतांना मात्र विधानसभा निवडणुकीत झालेली डॉ.विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी यांच्या युतीचे काय होईल याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण निवडणुकीत या दोघांनी राज्याच्या राजकारणात काहीही झाले तरी आता युती न तोडण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यामुळे हा मुद्दा अधीक चर्चेत आला आहे.

Web Title: Formula for preparation of implementation of State formula in GP elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.