भोंगरा येथे हातभट्टीवर धाड; साडेसतरा हजाराचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:38 IST2019-12-30T12:37:54+5:302019-12-30T12:38:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील भोंगरा गावात बेकायदा हातभट्टीची दारू बनवत असताना पोलीस पथकाने छापा टाकून १७ हजार ...

भोंगरा येथे हातभट्टीवर धाड; साडेसतरा हजाराचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील भोंगरा गावात बेकायदा हातभट्टीची दारू बनवत असताना पोलीस पथकाने छापा टाकून १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, असलोद दूरक्षेत्र अंतर्गत असलेल्या भोंगरा, ता.शहादा येथे एका घराच्या आडोशाला एक जण गावठी हातभट्टी लावून दारू तयार करून स्वत: कब्जात बाळगून तिची चोरटी विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांना मिळाली. त्यांनी लागलीच जमादार रमेश पवार यांना स्ट्रायकिंग फोर्स घेऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने गाव गाठले गावात एका घराच्या पाठीमागे आडोशाला धूर निघताना पथकाला दिसले. त्याठिकाणी एक जण दारू बनविताना व कब्जात दारू बनविण्यासाठी गूळमिश्रीत फुलाच्या तसेच गावठी हातभट्टीची दारू बाळगून असलेला दिसला. त्याला नाव विचारले असता बादशाह उर्फ लक्ष्मण ताराचंद पवार (३२) रा.भोंगरा असे सांगितले. त्याच्याजवळ असलेले प्लॅस्टिक कॅन, ४० लीटर गावठी हातभट्टीची दारू, दारु बनविण्यासाठी लागणारे रसायन असा १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रमेश पवार, तारासिंग वळवी, आकीब खाटीक, उमेश पाटील यांच्या पथकाने केली.