शहाद्यासाठी नवीन पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा सुरू; एक एकर जागाही मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:34+5:302021-08-15T04:31:34+5:30
शहादा पोलीस ठाण्यांतर्गत येणारा भाग आणि शहादा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन एक पोलीस ठाणे हवे ...

शहाद्यासाठी नवीन पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा सुरू; एक एकर जागाही मंजूर
शहादा पोलीस ठाण्यांतर्गत येणारा भाग आणि शहादा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन एक पोलीस ठाणे हवे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे. वाढती लोकसंख्या आणि इतर बाबी लक्षात घेता त्या पोलीस ठाण्यावर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे नवीन पोलीस ठाणे लवकरात लवकर व्हावे यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितले. नवीन पोलीस ठाण्यासाठी किमान ९० पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकारी असे मिळून जवळपास १००पेक्षा अधिक जणांची गरज असते. त्यासाठी पदनिर्मिती आणि इतर बाबींसाठी अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. जर आहे त्या मनुष्यबळात पोलीस ठाणे सुरू करावयाचे असेल तर त्यालाही परवानगी दिली जाते; परंतु जिल्हा पोलीस दलात आधीच रिक्त जागा आहेत. आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे नवीन पदनिर्मिती करूनच शहादा ग्रामीण पोलीस ठाणे सुरू करावे यासाठी प्रयत्न राहणार आहे. शहादा ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी महसूल विभागाकडून एक एकर जागादेखील मंजूर करून घेतली आहे.
याशिवाय नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासाठीदेखील नवीन व स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे कामकाज पालिकेच्या सामाजिक सभागृहात सुरू आहे, तर शहर पोलीस ठाणे महसूल विभागाच्या इमारतीमध्ये आहे. त्यांना स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी मागणी असल्याचेही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले.