शहादा व तोरखेडा येथील पाच जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:51 IST2020-07-10T12:51:29+5:302020-07-10T12:51:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील श्रीराम कॉलनी येथील पिता-पुत्र व तालुक्यातील तोरखेडा येथील एक महिला तसेच शहरातील दोन ...

शहादा व तोरखेडा येथील पाच जणांना कोरोनाची बाधा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील श्रीराम कॉलनी येथील पिता-पुत्र व तालुक्यातील तोरखेडा येथील एक महिला तसेच शहरातील दोन महिला असे पाच बाधीत रुग्ण असल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला आहे. पाचपैकी दोघांवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला तालुक्यातील २३ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी २० निगेटीव्ह आणि तीन पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांपैकी एक महिला तोरखेडा येथील पूर्वीच्या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील होती तर शहरातील दोन्ही महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यांना प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला.
नाशिक येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेले येथील पिता-पुत्र पॉझिटीव्ह असल्याबाबत माहिती आरोग्य प्रशासनास नाशिक येथून मिळाली म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रीराम कॉलनी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती तसेच नाशिक येथे ज्या वाहनचालकाला सोबत गेले त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. श्रीराम कॉलनीत पितापुत्र कोरोना बाधीत आढळून आल्यानंतर प्रशासनाने या भागात कंटेनमेंट व बफर झोनची निर्मिती केली असून प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील परिसर श्रीराम कॉलनी, त्रिमूर्ती क्लासेस परिसर तसेच बफर झोनमध्ये मोहिदा रोड, कल्पनानगर, वृंदावननगर, गणेशनगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, स्टेट बँक चौक परिसर, ब्रह्मसृष्टी कॉलनी, नवीन पिपल्स बँक परिसर, विकास कॉलनी, मेमन कॉलनी या वसाहतींचा समावेश करण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे श्रीराम कॉलनी परिसरात सायंकाळी निर्जंतुकीकरण करण्यात आले.
दरम्यान, नाशिक येथील खासगी रुग्णालयात शहरातील अन्य एक व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. या व्यक्तीच्या निकट संपर्कातील तीन व्यक्ती विलगीकृत करण्यात आल्या आहेत. पैकी या व्यक्तीच्या कुटुंबातील एका महिलेस त्रास होत असल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला पाठवण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
शहरातील शंकर विहार नगरातील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री उशिरा पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण परिसरात सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहरात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने कोरोना योद्धा म्हणून शहरवासीयांच्या सेवेत असणारा शासकीय कर्मचारी कोरोना बाधीत झाल्याने त्यांच्या कार्यालयात व संपर्कात येणाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या परिवारातील व अतिसंपर्कातील सहा जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे तर या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांचे कार्यालयदेखील सील करण्यात आले असून त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कार्यालयांमध्येही प्रवेश बंद करण्यात आला आहे. श्रीरामनगर परिसरातही औषध फवारणी करण्यात आली.