परदेशातून आलेले पाच जण निगराणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:26 IST2020-03-25T13:26:34+5:302020-03-25T13:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परदेशातून भारतात प्रवास करुन आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरातील होळ ...

परदेशातून आलेले पाच जण निगराणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परदेशातून भारतात प्रवास करुन आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरातील होळ तर्फे हवेली शिवारातील विद्यार्थिनी वसतीगृहात विलगीकरण कक्ष तयार केला आहे़ या कक्षात मंगळवारी सकाळपासून पाच नागरिकांना दाखल करण्यात आले आहे़
जिल्हा सामान्य रुग्णालयात दक्षता म्हणून तयार करण्यात कोरोना विलगीकरण कक्षात तपासण्या करुन आतापर्यंत ३० जणांची तपासणी करण्यात आली होती़ यापैकी १० जणांचे नमुने हे तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेकडे देण्यात आले होते़ हे सर्व आठ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर उर्वरित तीन नमुन्यांच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे़ तत्पूर्वी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली होती़ यातील केवळ परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यांतर्गत आतापर्यंत पाच जण वसतीगृहात तयार केलेल्या कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आहे़ अमेरिका आणि युरोपिय देशांमधून आलेल्या या नागरिकांना केवळ निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे़ आरोग्य विभागाने शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि नवापुर येथे वसतीगृह, आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना केली असून हे कक्ष उपचारांसाठी सज्ज आहेत़ यापैकी केवळ नंदुरबार येथील कक्षातच पाच जणांना ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे़ देशाबाहेरुन येणारे बरेच जण स्वत:हून जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेत असल्याने अडचणी दूर होत आहेत़
प्रशासनानेही खबरदारी म्हणून ग्रामीण भागात परतणाऱ्या भूमिपूत्रांची माहिती देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे़ तालुकास्तरावरील अधिकारी सातत्याने परदेशातून येणाऱ्यांचा आढावा घेत आहेत़