सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:50 IST2019-05-13T11:50:34+5:302019-05-13T11:50:59+5:30
२७ फेऱ्यांचे नियोजन : व्हीव्हीपॅट आणि टपाली मतमोजणी राहणार वेगळी

सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल शक्य
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सूकता लागून आहे. कोण जिंकणार याबाबत अनेकांनी पैजा देखील लावल्या आहेत. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. साधारणत: २७ फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी सायंकाळचे साडेचार ते पाच वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकुण ६८.३३ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत असली तरी भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार या निवडणुकीत ‘व्टिस्ट’ निर्माण करणार आहेत. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सूकता लागून आहे. निकालाची तारीख जशी जवळ येत आहे तशी उत्सूकता ताणली जात आहे. निकालाबाबत अनेकांनी लाखोंच्या पैजा देखील लावल्या आहेत. एकीकडे सर्वसामान्यांना निकालाची उत्सूकता आहे तर दुसरीकडे प्रशासनाने मतमोजणीची तयारीचे नियोजन अंतिम टप्प्यात आणले आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याकडे जिल्हा प्रशासनाचा कल राहणार आहे.
मतदान वाढल्याने
मोजणीला लागणार वेळ
यंदा मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सर्वाधिक मतदान झालेल्या लोकसभा मतदार संघापैकी नंदुरबार एक आहे. एकुण ६८.३३ टक्के मतदान झाले. अर्थात १२ लाख ७७ हजार ७९६ जणांनी मतदान केले आहे. तेव्हढ्या मतदानाची मोजणी करावी लागणार आहे. गेल्या वेळी १० लाख ९३ हजार २२१ जणांनी मतदान केले होते. यंदा एक लाख ८४ हजार ५७५ अधीक मतदान मतदान झाले आहे. गेल्यावेळी साधारणत: अडीच वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र वेळ लागण्याची शक्यता आहे.
३० व्हीव्हीपॅटमधील
चिठ्ठयांचीही मोजणी
यंदाच्या निवडणुकीपासून आपले मत कुणाला गेले हे पहाण्याची सोय अर्थात व्हीव्हीपॅटची सोय करण्यात आली होती. त्यातील चिठ्ठी सुरक्षीत अर्थात ते मशीनही सील करण्यात आलेले आहेत. यापैकी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील कोणतेही पाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांचीही मोजणी करण्यात येणार आहे. अर्थात सहा मतदार संघातील ३० व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठींची मोजणी होणार आहे. एका व्हीव्हीपॅटच्या मोजणीला साधारणत: १२ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सर्व व्हीव्हीपॅटची मोजणीला किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे निकाल तेवढा लांबणीवर जाणार आहे.
कर्मचारी नियुक्ती
मतमोजणीसाठी कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारणत: ४०० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
एकुण ८४ टेबल राहणार आहेत. अर्थात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे १४ टेबल राहतील. त्या टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे.