मयतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:42+5:302021-02-16T04:32:42+5:30
नंदुरबार : खडकी ते तोरणमाळ ता. धडगाव दरम्यान झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांच्या वारसांना पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या ...

मयतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
नंदुरबार : खडकी ते तोरणमाळ ता. धडगाव दरम्यान झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांच्या वारसांना पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. या अर्थसाहाय्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करावा, त्यासाठी रक्कम बँकेत ठेवावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जखमी झालेल्या लहान मुलांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी करून मुलांच्या प्रकृतीची आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी, असे आदेशही त्यांच्याकडून देण्यात आले.
मास्क न लावल्याने पाच जणांवर कारवाई
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे अमृत सुरूपसिंग पाडवी, लक्ष्मण सोनेसिंग तडवी, अक्कलकुवा येथे अभिजीत महेंद्रसिंग परदेशी, नवापूर येथे ईसाक फकीरा काकर व नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथे राजेंद्र बळीराम पाटील अशा पाच जणांवर पोलिसांनी मास्क न लावल्याने कारवाई केली. त्यांच्याविरोधात त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
नंदुरबार : शहरातील नवीन चक्री मार्गांवर रस्ता दुभाजकात लावलेले पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील उड्डाणपूल तसेच ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने पायी ये-जा करणाऱ्यांना अडचणी येत आहेत. याकडे पालिकेने लक्ष देत कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मिरची पूरक उद्योगांना मिळतेय चालना
नंदुरबार : शहरातील पथारींवरील मिरची हंगाम आवरता घेतला जात आहे. यानंतर ठिकठिकाणी सुरू होणाऱ्या चटणी व कोरडी मिरची विक्रीला मात्र गती येणार आहे. वळणरस्त्यालगत अनेक जण चटणी व कोरडी मिरची विक्रीचा व्यवसाय सुरू करतात. पावसाळ्यापर्यंत हा व्यवसाय सुरू राहत असल्याने त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदाही अनेकांची दुकाने थाटणे सुरू झाले आहे.