पानबाराजवळ धावत्या ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:12 IST2019-12-20T12:12:19+5:302019-12-20T12:12:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात पहाटे पाच वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने पेट ...

पानबाराजवळ धावत्या ट्रकला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात पहाटे पाच वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने पेट घेतल्यामुळे ट्रकचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या महामार्गावर सध्या वाहने जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
धुळे-सुरत महामार्गावरून ट्रक (क्रमांक एम.एच.११ एएल- ७५११) अंकलेश्वरकडे जात होता. हा ट्रक पानबारा शिवारात आल्यावर अचानक ट्रकच्या पुढील भागाने पेट घेतला. चालक निहाल अहमद मोहम्मद याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभी केली. ट्रकचा पुढील भाग जळाला असून त्यात सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
या घटनेपासून काही अंतरावर पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाजवळ जर ही दुर्घटना घडली असती तर फार बिकट समस्या निर्माण झाली असती. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अग्नीउपद्रवअंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अरुण कोकणी हे करीत आहेत.