विना मास्क फिरा दोन हजार दंड भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:49 IST2020-09-16T12:49:47+5:302020-09-16T12:49:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. आता पोलीस दलाने ...

विना मास्क फिरा दोन हजार दंड भरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. आता पोलीस दलाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्यांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंड किंवा पाच दिवस कैद अशी शिक्षा सुनावण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर करणे सक्तीचे असल्याचे पोलीस दलाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आठ ते दहा दिवसात प्रचंड वाढली आहे. बाधितांची संख्या चार हजाराच्या घरात गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने सर्व नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे व सामाजिक अंतर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.
पोलीस दलातर्फे गेल्या काही दिवसात विना मास्क फिरणाऱ्यांवर थेट कारवाई केली आहे. अशा लोकांना न्यायालयात पाठविले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास पाच दिवसांची साधी कैद देखील सुनावण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर गांभिर्याने करावा. शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन देखील पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.