अखेर ‘त्या’ शेतातील पंचनामा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:11 IST2020-10-21T21:11:26+5:302020-10-21T21:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी: शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब झाला ...

अखेर ‘त्या’ शेतातील पंचनामा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी: शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब झाला आहे. हे पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांवर कंबरेएवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली असून, याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.
ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणालगत आहे. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणातील पाणी शेतशिवारात येऊन पाणी साचून पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी लिमजी छगन पाटील यांचे सुसरी धरणलगत गोदीपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती.
सुसरी धरणाचे पाणी थेट शेतात साचल्याने कापूस पिकाचे नुकसान होत आहे तर काही प्रमाणात हाताशी आलेल्या कापसाची वेचणी स्वतः शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यात जीव धोक्यात टाकून करावी लागत आहे.
नुकसन भरपाईची मागणी
धरणाचे पाणी शेतात साचून शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. काही शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणात गेल्याने त्यांना त्याचा मोबदला काही प्रमाणात मिळाला तर काही शेतकऱ्यांना मोबदलाच मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पेरणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचले असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागामार्फत संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्यात आला. या वेळी तलाठी स्मिता पाटील, शेतकरी लिमजी छगन पाटील, रमेश पाटील, गोपाळ पाटील, दिनेश पाटील, कोतवाल भरत नेवरे आदी उपस्थित होते.